सिटी बेल । अलिबाग । अमूलकुमार जैन ।
कृषी विभागाच्या माध्यमातून गावोगावी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील भात हे मुख्य पीक असून , पूर्वीच्या कुलाबा जिल्हाला भाताचे कोठार म्हणून ओळख होती . परंतु , कालपरत्वे निसर्ग लहरीमुळे हवामानामुळे भात पिकाचे उत्पादन कमी होऊ लागल्याने व बी बियाणांच्या बदलत्या वाणामुळे भात पीक उत्पादन कमी होऊ लागल्याने शेतकरी कमी प्रमाणात भात पीक घेऊ लागला . त्यामुळे तळा तालुका कृषी कार्यालयाने भात उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे .
तळा तालुका डोंगराळ व दुर्गम असून , तालुक्यातील भात हे मुख्यपीक असून ८५ टक्के पेक्षा जास्त शेतकरी सरळ किंवा सुधारित वाणांचा वापर करतात .
त्यामुळे एकदा बियाणे खरेदी केल्यानंतर तीन वर्षापर्यंत तेच बियाणे वापरले तरी चालते त्यामुळे दरवर्षी बियाणे खरेदी करण्याचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे .परंतु घरच्या बियाण्याला प्रक्रिया न केल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते .
” बीज प्रक्रियेमुळे उगवण क्षमता वाढते . त्याचबराबर जमिनीतून व बियाणांमधून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा वेळीच बंदोबस्त झाल्याने उत्पादन वाढ होते .
हाच उद्देश ठेवून कृषी विभागाच्या माध्यमातून या लॉक डाऊन च्या काळात गावोगावी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येत आहे ” अशी माहिती तळा येथील मंडळ कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली .
” शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने योग्य आधुनिक पद्धतीने शेती केली तर निश्चितच भात पिकाचे उत्पादन वाढीस मदत होणार आहे .” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भातामध्ये बीजप्रक्रिया तीन प्रकारे केली जाते
1) मिठाच्या पाण्याची बीजप्रक्रिया –
यामध्ये १० लिटर पाण्यात ३०० ग्राम मीठ विरघळून घ्यावे व त्यामध्ये भात बियाणे टाकावे व चागले ढवळून घ्यावे . त्यानंतर द्रावण स्थिर होऊ द्यावे , पोकळ व रोगाने हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे . तसेच तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत २४ तास वाळवावे .
2) बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रिया –
बियाण्यामध्ये राहणाऱ्या व तसेच उगवल्यानंतर अपायकारक ठरणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो . यामध्ये थायरम , कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिपया पैकी कोणतेही एक बुरशीनाशक २.५ ग्राम या प्रमाणात १ किलो बियाणास पेरणीपूर्वी चोळावे .
3) जिवाणू खताची बीजप्रक्रिया-
बियाणे रुजल्यापासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरद सहज उपलब्ध व्हावे म्हणून जिवाणू खताची बीज पक्रिया केली जाते . यामध्ये पीएसबी – स्फुरद विरघळणारे जिवाणू हे जिवाणू जमिनीतील स्पुरद पिकाला उपलब्ध करून देतात .
अझोटोबेक्टर नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू हे हवेतील नत्र स्थिर करून विकास उपलब्ध करून देतात . वरील दोनही जिवाणू खताचे प्रमाण प्रत्येकी २५ ग्राम प्रती १० किलो बियाणे याप्रमाणे आहे .








Be First to Comment