उंच उभारु धैर्याची गुढी..
गुढीपाडवा हे आपले मराठी नवीन वर्ष.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस.. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त..! यादिवशी घराची खरेदी, वस्तुंची खरेदी,भुमिपुजन असे विविध प्रकारची शुभकार्य केली जातात, आपण दरवर्षी ढोलताशांच्या साथीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत करतो. तोरणं ,पताके व दारी सुख समृद्धी, भरभराटीची, यशाची गुढी उभारायची आपली प्रथा..! उंच बांबूच्या काठीला नवीन वस्त्र, कडूलिंबाची डगळी , साखरेची गाठी व मंगळसूत्र घालून वरुन तांब्याची लोटी उलटी ठेवून त्याला घट्ट बांधून ठेवली जाते. त्याची मनोभावे पुजा करुन.श्रीखंड ,पुरी चा नैवेद्य असतोच पण कडुलिंब व त्यात हिंग, गुळ घालून हा मुख्य नैवेद्य दाखविला जातो. नवीन वर्षापासून हा नैवेद्य खाल्ला कि मग जोमाने कामाला सुरुवात करायची..वर्षभर आरोग्य चांगले रहावे, प्रतिकारशक्ती वाढावी व कामात स्फुर्ती यावी म्हणून हा कडू पण अतिशय गुणकारी प्रसाद खाण्याची प्रथा बहूदा वर्षभरासाठी असावी, पण कालांतराने केवळ चवीला कडू असल्याकारणाने केवळ पाडव्याला हा प्रसाद बळेच खाल्ला जातो, म्हणजे थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या दिवसापुरतेच त्याचे महत्त्व ..!
सध्याच्या या विज्ञान युगात कितीही प्रगती झाली तरी रितीरिवाजांप्रमाणे संस्कृतीचा मान ठेवून कुठलीही परंपरा न मोडता अगदी मनापासून आपण हे सण समारंभ साजरे करत असतो आणि कायम करत राहणार यात काही शंकाच नाही..
पण मागच्या वर्षीपासून गुढीपाडव्याला कोरोनाचे गालबोट लागले..आणि मोठ्या जल्लोषात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात पहिल्यांदाच खंड पडला..मग घरातच साध्या पद्धतीने सण साजरा करण्यात आला.
मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही
कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे..! पण आता या संकटाला आपण धीराने व धैर्याने सामोरे जाण्याची वेळ आली आहे. काटेकोरपणे पालन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होवू या..!
तुम्हाला आठवत असेलच कि, आपल्या जन्मापासून ते वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत आईबाबा लस टोचून घेण्यासाठी आपल्याला डॉ.कडे नेत होते.
तुम्ही म्हणाल आता या लसीचा इथे काय संबंध आणि कशासाठी? अहो आपल्या लहानपणी आईबाबा आपल्याला लस देण्यासाठी डॉ.कडे घेवून जात,पण आता आपल्याला या उलट करायचे आहे. त्यांना या वयात भीती पण वाटत असते, म्हणूनच वृद्ध आईवडीलांना त्यांची काळजी घेवून, धीर देवून त्यांना लस टोचून आणायची आहे .तसेच शेजारी ,ओळखीतले , नात्यातील काही जेष्ठ नागरिक असतील त्यांनाही धीर देत, मदतीला धावून जायचे आहे.जे कोरोनाशी झुंज देत आहे, त्यांना शक्य ती मदत करायची आहे ! त्यांचे आत्मबल वाढवून मनाला उभारी देण्याचे महत्त्वाचे कार्य आपण या नव्या वर्षापासून सुरू करु या..!
आता सध्या चालू असलेल्या कोरोना युद्धात आपण मिळून या कोरोना विषाणूशी लढा देवू..! या लढाईमध्ये आवश्यक ते सर्व नियम पाळून , जबाबदारीने धैर्याने तोंड देवू या, तेही मास्क नावाचे शस्र व्यवस्थित लावून आणि सुरक्षित अंतर , स्वच्छतेचे पालन करत. या विकसनशील भारताचा जबाबदार नागरिक म्हणून ही धैर्याची गुढी उंच उभारू..व पुढच्या वर्षापर्यंत हा संकल्प नित्यनेमाने पुर्ण करण्याचा संकल्प करु या..! तरच आणि तरच ही, कोरोना लढाई आपण जिंकू व इतरांना पण आपल्या या लढाईमध्ये सामिल करून घेवू…मग बघा या वर्षभरात ह्या भयंकर विषाणूचा नायनाट करुन आपण पुढील नववर्षाचे स्वागत , मोठ्या जल्लोषात , ढोलताशांच्या गजरात आपण नक्कीच साजरा करु…करताय ना मग तयारी ? धैर्याची गुढी उभारायला?
सौ. मानसी जोशी,
खांदा कॉलनी.







Be First to Comment