सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
तमाम नागरिकांनी कोरोना काळात शासनाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून आपण आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक असून दुसऱ्याचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे असून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणे विनाकारण कोठेही गर्दी करु नये असा महत्त्वाचा सल्ला आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकिता भोईर यांनी तमाम नागरिकांना दिला.
त्यांनी पुढे असे सांगितले की, कोरोना लसीचा लाभ लाभार्थ्यांनी आवश्यक घ्यावा. कोविड लस घेतल्यानंतर सहसा कोणताही त्रास होत नाही. उगाच काही जण अफवा पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण करतात अशा भूलथापांवर कोणीही विश्वास ठेवू नका. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर कदाचित तापाची थोडी कणकण जाणवली तर कोणीही घाबरून जाऊ नका. लसीकरणानंतर गोळ्या दिल्या जातात त्या घेणे. सध्या कोरोना आटोक्यात आणण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी वर्ग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत असतात. या सेवेचा लाभ जरूर घेवून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. अंकिता भोईर यांनी केले आहे.








Be First to Comment