Press "Enter" to skip to content

नाणे गिळलेल्या सव्वा वर्षाच्या बालकाचे प्राण वाचविले


अलीबागच्या सुयोग मुरकूटे करीता डॉ राजेंद्र चांदोकर, डॉ संजीव शेटकार ठरले देवदूत

सिटी बेल । धनंजय कवठेकर ।
। अलिबाग ।

एक रुपयाचे नाणे गिळल्यानंतर ते एक वर्ष दोन महिने वयाच्या लहानग्याच्या अन्ननलिकेत अडकले होते. बालरोग तज्ज्ञ डॉ राजेंद्र चांदोरकर आणि भुलतज्ज्ञ डॉ संजीव शेटकार यांनी महतप्रयासाने भुल देत ते नाणे काढुन या लहानग्याचे प्राण वाचविण्यात यश मिळविले.

या प्रक्रियेत बाळाच्या जिवाला प्रचंड धोका होता. मात्र डॉ. चांदोरकर आणि डॉ शेटकार यांनी हे आव्हान स्विकारुन लहानग्या सुयोग राकेश मुरकूटे याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्यानंतर त्याच्या पालकांनी कृतज्ञेतून डॉक्टरांना धन्यवाद दिले.

चिंचवली नारंगी येथील सुयोग राकेश मुरकूटे या एक वर्षे दोन महिने वर्षाच्या मुलाने खेळताना एक रुपयाचे नाणे गिळले. हा प्रकार कळताच त्याच्या आई वडिलांनी त्याला गावातील दवाखान्यात नेले. तेथून त्याला एक्स रे काढण्यासाठी प्रयास रुग्णालयात पाठविण्यात आले. एक्सरे मध्ये अन्ननलिकेत अडकलेले नाणे दिसताच डॉ रविंद्र म्हात्रे यांनी नाणे काढण्यााठी पनवेल अथवा मुंबईत जाण्याचा सल्ला दिला. मात्र सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच आर्थिक अडचणीमुळे पालकांनी जाण्याबाबत असमर्थता दाखवत बालरोग तज्ज्ञ डॉ राजेंद्र चांदोरकर यांना संपर्क साधला.

डॉ चांदोरकर यांनी परिस्थिती समजावून घेत ज्येष्ठ भुलतज्ज्ञ डॉ संजीव शेटकार यांच्या मदतीने सदर नाणे काढण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी पालकांसोबत काही तास चर्चा करुन त्यांना धोक्याची जाणीव करुन दिली. त्यावर पालकांनी जे होईल त्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेत डॉक्टरांवर विश्‍वास दाखवला त्यानुसार रविवारी सकाळी सर्व वैद्यकीय तयारी करुन या बालकाला डॉ शेटकार यांनी भुलीचे इंजेक्शन दिले. एवढया लहान मुलाला भुल देणे धोकादायक ठरु शकते मात्र भुलतज्ज्ञ डॉ संजीव शेटकार यांनी आपले कौशल्य पणाला लावले.

त्यांनतर त्याला कुत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा सुरु करण्यात आला. स्पेशल वैद्यकिय चिमटा आणि लॅरीग्स्कोपच्या वापराने कौशल्यपुर्वक सदर नाणे काढण्यात डॉ राजेंद्र चांदोरकर यांना यश आले. या दरम्यान हे नाणे जर चुकून श्‍वसननलिकेत गेले असते तर जिवावर बेतू शकले असते. मात्र अथक परिश्रमपुर्वक हे आव्हान पेलत डॉ चांदोरकर आणि डॉ शेटकार यांनी सुयोगला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत आपली सामाजिक बांधीलकी आणि वैद्यकिय कर्तबगारी पुन्हा एकदा सिद्ध केली. चांदोरकर यांच्या कर्मचार्‍यांचे देखील या मोहिमेत सहकार्य लाभले.

आपल्या मुलाला सुखरुप या संकटातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या आई बाबा आणि आजोबांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.