सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे)
द्रोणागिरी नोड, उरण येथील सेक्टर 47 मधील अक्षर एव्होरा ह्या हौसिंग सोसायटीचे सेक्रेटरी अरूण पाटील व चेअरमन सुरेश पाटील यांच्या विनंतीला मान देवुन कोरोना विषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. सदर मार्गदर्शन शिबीरासाठी सोसायटीचे सर्व पदाधिकारी व रहिवासी यांनी सहभाग नोंदवला. ह्या शिबीराला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. कविता मढवी वैद्यकीय अधिकारी (KDMC), सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, श्री. जगताप आरोग्य प्रतिनिधी आणि प्रा. राजेंद्र मढवी हे उपस्थित होते. सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरूवात केली. प्रा. राजेंद्र मढवी यांनी Covid-19 ह्या रोगाची लक्षणे, तसेच तो रोखण्यासाठी आहार कसा असावा आणि कोणती खबरदारी घ्यावी ह्या संदर्भात विस्त्रुत माहिती दिली. त्यानंतर संतोष पवार यांनी होम क्वारंटाईन चे महत्त्व पटवुन दिले व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना समजावुन सांगीतले. तसेच उरण तालुक्यातील रूग्णांची सध्याची काय परिस्थिती आहे आणि पुढील १५ दिवसांमध्ये काय परिस्थिती उद्भवेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे केले. सोसायटीमधील जिम का सुरू करू नये, सुरक्षा रक्षकाने कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात देखील आवश्यक सुचना केल्या. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता मढवी व श्री. जगताप यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मानसिक सकारात्मता अंगी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले. तसेच कोरोना पॉजीटीव्ह रूग्णाला घाबरून न जाता त्याला कश्या प्रकारे सहकार्य करावे व कशी स्वत:ची काळजी घ्यावी ह्या संदर्भात सुचना केल्या. कोरोना पॉजीटीव्ह रूग्णाला कश्याप्रकारे ट्रिटमेंट दिली जाते, कोणती औषधे दिली जातात, सर्वात महत्त्वाचे लक्षणे दिसत नसलेल्या रूग्णाची व्यवस्था तुम्ही घरीच कशी करू शकता ? त्या संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सुचनां संदर्भात मार्गदर्शन केले. शासन व्यवस्थेला दोष न देत बसता आपण स्वत: काय करू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे असे मत संतोष पवार यांनी व्यक्त केली. शिबीरात खुप चांगली माहिती मिळाल्यामुळे असा उपक्रम प्रत्येक सोसायटी, ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्याची गरज असल्याचे मत सोसायटीचे चेअरमन श्री. सुरेश पाटील व सेक्रेटरी श्री. अरूण पाटील यांनी व्यक्त केले.
Be First to Comment