आंतरिक गोडवा..
यावर्षी संक्रांत चांगली महिनाभर होती..आता उद्या रथसप्तमीला संपेलच. म्हणूनच थंडी आहे तोपर्यंत स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी भरपूर तिळगुळ खा. म्हणजेच सगळ्यांशी आयुष्यभर गोड बोलून, आनंदी रहा.
.माझ्या लहानपणी आम्ही भावंडे खेळत असतांना भांडणे झाली कि, शांत बसण्यासाठी आई आम्हाला तिळगुळाचा लाडू देत, मग आम्ही लाडू खाऊन होई पर्यंत भांडणे विसरून पण जात..आणि पुन्हा खेळायला लागत..! म्हणजेच भांडणे, रूसवा घालवण्यासाठी एकमेकांना तिळगूळ देतात का ? असे अनेक प्रश्न त्यावेळी नेहेमीच माझ्या बालमनाला पडतं..!
मग संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तिळगुळाचे लाडू ,वड्या असे गोड गोड खायला मिळायचे, आम्ही छोट्या स्टीलच्या डब्या घेवूनच फिरायचो..नुसती धमाल असायची. मला अजूनही आठवते..! आमच्या शेजारी वयस्क काका, काकू रहात होते. वय अंदाजे ६० ते ६५ दोघेही स्वभावाने खुप गोड, प्रेमळ. दोघांनाही मधुमेह होता..बोलक्या व गोड स्वभावामुळे ते सगळ्यांच्या परिचयाचे होते. खरं म्हणजे त्यांना स्वतःला गोड खायला चालत नव्हते तरी दरवर्षी काकू मात्र सगळ्या लहान मुलांसाठी मोठा डबा भरून तिळगुळाचे लाडू करायच्याच..!
यावरून मला नेहमी प्रश्न पडायचा की, स्वतः एकही गोड पदार्थ न खाता दुसऱ्यांना गोड गोड खाऊ घालण्याची , व गोड बोलण्याची दोघांची सवय म्हणजे त्यांच्या मनात ठासून भरलेला जो आंतरिक गोडवा, शब्दांमध्ये भरलेले माधुर्य होते. त्यामुळेच समोरचा व्यक्ती कितीही निष्ठूर असला तरीही तो त्यांच्यासोबत बोलतांना आपोआप विनम्रपणे बोलत असे..माणसे जोडायची ही कला निसर्गाने जन्म:त त्यांना दिली होती , आणि त्यांनी ती कला एखाद्या अनमोल दागिन्याप्रमाणे जपून ठेवली होती.
आपल्या भारतीय संस्कृतीत व निसर्ग चक्राप्रमाणे हिवाळा ऋतुत आपण गरम , पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करत असतो. त्यात तिळगूळ उष्ण , स्निग्ध , भरपूर कॅल्शियम युक्त असे त्यात विविध गुणधर्म असल्यामुळे या थंडीच्या दिवसात खाणे आरोग्यासाठी हितकारक आहे..
मग नात्यांचेही तसेच आहे. राग, गैरसमज , ताणतणाव दूर व्हावे,
सगळ्यांनी मिळून मिसळून रहावे
म्हणून मोठ्यांनी लहानांना तिळगुळ वाटण्याची प्रथा सुरू झाली असावी.
पण मला असाही अनुभव आला आहे कि, आजकाल काहीजण वरुन गोड बोलतं असली तरीही आतल्या आत राग धरुन बसतात. तिळगूळ खायला दिले तरी ते खातील आणि वर वर खोटे हसू दाखवतील..! मग प्रथेप्रमाणे तिळगुळाबरोबरच हळूवार फुंकर घालून म्हणजेच गोड बोलून, हसून त्यांच्या मनातला कडवटपणा काढायचा. राग शांत झाला कि, मनातले सगळे मळभ आपोआप दुर होईल आणि नात्यातला गोडवा गुळाप्रमाणे टिकून राहिल.. हो न..!!
यावर्षी तर संक्रांत चांगली महिनाभर होती..आता उद्या रथसप्तमीला संपेलच. म्हणूनच थंडी आहे तोपर्यंत स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी भरपूर तिळगुळ खा. म्हणजेच सगळ्यांशी आयुष्यभर गोड बोलून, आनंदी रहा.
मोठ्यांनी लहानांना तिळगूळ भरवा..
त्या गोड आठवणी मनात साठवा..
नात्यातील एकी व गोडवा टिकावा
म्हणून संवाद वर्षभर वाढवा..
मानसी जोशी, खांदा कॉलनी.
Be First to Comment