
“गोल्डन रुल” पाळा कोरोनाला दूर ठेवा..!
“सरकारी कर्मचारी, कोरोना वर मात करी”
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रायगड व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानस मैत्र हेल्प लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने “सरकारी कर्मचारी कोरोना वर मात करी” फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना डॉ. अमोल भुसारे यांनी, आपल्या मार्गदर्शनात “गोल्डन रुल” पाळले तर कोरोना ला दूर ठेऊ शकतो असे सांगितले. कोरोना चे भय सर्वदूर पसरले आहे, वास्तवात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. काळजी घ्या, काळजी करू नका या आवाहनाकडे लक्ष द्या व सतर्क रहा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे व अलिबाग येथील ज्येष्ठ मानसोपारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली.
मार्गदर्शन करताना डॉ. अमोल भुसारे यांनी, “गोल्डन रुल” मध्ये शारिरीक अंतर, मास्कचा योग्य व कायम स्वरुपी वापर, सातत्याने हात धुणे या नियमांचे पालन करून आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. कोरोना संसर्ग कसा झाला, कोणा पासून झाला, याचा शोध घेण्या पेक्षा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी. संसर्ग झाल्यास लवकर निदान व तात्काळ उपचार सुरु करा. कोरोना सर्वांना होऊ शकतो मला सुद्धा होऊ शकतो ही जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. लोकांमध्ये अज्ञान आहे, अज्ञान दूर करून योग्य शास्त्रीय माहिती देण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा. असे प्रतिपादन डॉ. अमोल भुसारे यांनी केले.
टिव्हीमुळे भयगंड वाढत आहे, टिव्ही वरील बातम्या सतत पाहू नका. रुग्ण संख्या जास्त असेल तरी मृत्युदर फारच कमी आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, योग्य औषधोपचार करणे, आधार देणे, मित्रांबरोबर फोनवर बोलणे या मुळे आपण कोरोनावर मात करू शकतो. घाबरून न जाता ओळखीच्या माणसांना आधार द्यावा. योग्य माहिती पोहोचविणे, मानसिक आधार देणे हे काम मानस मैत्र हेल्पलाईन चे कार्यकर्ते करीत आहेत. आजवर सुमारे 1500 लोकांबरोबर हे कार्यकर्ते बोलले आहेत. असे डॉ अनिल डोंगरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक यांनी रायगड जिल्ह्यातील कर्मचारी यांनी कोरोना उपाय योजना करताना केलेले काम, कर्तव्य बजावताना मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना केलेली मदत, अन्नधान्य व इतर सहाय्य या बद्दल धन्यवाद दिले. कर्मचाऱ्यांनी कोरोनाची विशेष काळजी घेऊन आपले काम करावे, कोणतेही काम टाळू नये, एकमेकांना आधार द्यावा, हेल्पलाईन च्या माध्यमातून नागरिकांना मदत करा. रक्त दान व प्लाझ्मा दान करा असे आवाहन केले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या पैकी कोणाला कोरोना संसर्ग झाल्यास त्यांना मदत करा, मानसिक आधार व बळ द्या मनोबळ वाढले तर रुग्ण लवकर बरा होतो. जिल्ह्यातील प्रत्येक कर्मचारी प्रशासनाच्या बरोबरीने कोरोना विरुद्धच्या लढाईत पुढे असेल. आपण आपले योगदान देऊ आणि कोरोना विरोधातील ही लढाई जिंकू या, असे आवाहन सावंत यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंनिस खोपोली शाखेतील कार्यकर्त्यांनी कोरोना व सामाजिक बहिष्कार यावर चित्रित केलेले गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य सिद्धेश गोसावी यांनी केले. तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, वि. ह. तेंडुलकर, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, रत्नाकर देसाई यांनी सहाय्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईक यांनी केले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व महसूल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राकेश सावंत यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी व्यक्त केले तर सूत्र संचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जोडीदाराची विवेकी निवड विभाग राज्य कार्यवाह आरती नाईक यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले.






Be First to Comment