अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !
१७ फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्यावर थोडक्यात टाकलेला प्रकाश !!
वासुदेवांचा जन्म
वासुदेवांचा जन्म शिरढोण (जि.रायगड) येथे १८४५ या वर्षी झाला. त्यांचे आजोबा अनंतराव हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. १८१८ मध्ये इंग्रजांनी तो त्यांना रिकामा करून देण्यास सांगितले. ते नाकारून त्यांनी इंग्रजांशी सतत तीन दिवस लढाई केली. अशा आजोबांच्या स्वातंत्र्य प्रीतिचा वारसा घेऊन वासुदेव जन्माला आले. त्यांची घरची श्रीमंती होती. वैभवात जन्मलेले वासुदेव गोर्यापान वर्णाचे, सरळ नाकाचे, पाणीदार निळसर डोळ्यांचे आणि सुदृढ शरीरयष्टी असलेले तगडे वीर होते.
नोकरीत असतांना ब्रिटिशांच्या सैन्य व्यवस्थेची माहिती मिळवणे
शिक्षणानंतर मुंबईत जी.आय्.पी. रेल्वेत ग्रँट मेडीकल महाविद्यालयात वासुदेवांनी काही काळ चाकरी केली; पण वरिष्ठांशी खटका उडून त्यांनी ती चाकरी सोडली आणि मिलीटरी फायनान्स कार्यालयात चाकरी धरली. १८६५ या वर्षी त्यांचे पुणे येथे स्थानांतर (बदली) झाले, त्यावेळी त्यांना ६० रुपये मासिक वेतन होते आणि त्यांच्या कामावर वरिष्ठ इंग्रज अधिकारी खूश असत. सैनिकी विभागाशी संबंध असल्यामुळे ब्रिटिशांच्या सैन्य व्यवस्थेची बरीचशी माहिती त्यांना आपोआपच मिळाली.
अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध चीड निर्माण होणे
१८७० या वर्षी वासुदेवांना आई अत्यवस्थ असल्याचे वृत्त शिरढोणहून कळले. तिला भेटण्यासाठी त्यांनी कार्यालयातून सुट्टी मागितली; पण ती त्यांना मिळाली नाही. उलट अपशब्द ऐकावे लागले. वासुदेव तसेच आईच्या भेटीला निघून गेले; पण ते तेथे पोहचण्याआधीच आई मृत्यू पावली होती. आपल्या आईची शेवटची भेट होऊ न देणारा इंग्रज अधिकारी आणि एकंदर इंग्रज यांच्या विरोधात त्यांचे मन फार प्रक्षुब्ध झाले.
स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेणे
१८७१ या वर्षी पुण्यात काकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून जनतेची गार्हाणी दूर करण्यासाठी आघाडी उघडली. वासुदेवांनी त्यांच्या या कार्यात भाग घेतला. १८७३ मध्ये काकांनी खादी वापरण्याचे व्रत घेतले, तेव्हा वासुदेवांनीही फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली आणि ती आजन्म पाळली.
गुप्त संघटना स्थापन करणे
वासुदेव बळवंत फडके सुट्टीच्या दिवशी जवळच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वदेश आणि स्वातंत्र्य यांवर व्याख्याने देत फिरू लागले. गरीब जनतेची दु:खे जवळून पाहू लागले. ‘इंग्रजी राजवटीमुळेच तुमची ही अशी दैना आहे’, असे ते शेतकर्यांना सांगू लागले. त्यांनी पुण्यात तरुणांसाठी तलवार आणि दांडपट्टा चालवण्याचा अन् मल्लविद्या शिकवण्याचा वर्ग काढला. तो गुप्तपणे रात्री किंवा पहाटे नरसोबाच्या देवळापलीकडे निवांत जागेत चाले. त्यात शे-दीडशे तरुण येत. त्यात शरीर कमवण्यासाठी एक वर्ष अभ्यासाला सुट्टी देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेही होते. या तरुणांतून तापून सुलाखून निघालेल्या निवडक तरुणांची त्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली. प्रभात फेर्यांमधून, शाळा महाविद्यालयांना दिलेल्या भेटींतून आणि भक्तीपर कार्यक्रमांतून ते आणि त्यांचे सहकारी आपल्या कार्याचा प्रचार करत. दसर्याला रास्त्यांच्या वाड्यात शस्त्रपूजनाचा मोठा समारंभ होई. त्या वेळी दही-पोह्यांचा द्रोण हातात घेऊन स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा हे सभासद घेत. इंग्रजांचे हे राज्य उलथून स्वातंत्र्य मिळवल्याखेरीज देशाचे भले होणार नाही, अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांच्या मनात बंडाचे विचार चालू झाले. ते आत्मवृत्तात म्हणतात, ‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी ही सारी लेकरे झाली, त्यांनी अन्नावाचून उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही, म्हणून मी ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारले.’
ब्रिटीशांविरुद्ध बंड
ही वेळ राजकीय बंडाची म्हणजे दरोडे घालून राज्यसत्तेला आव्हान देण्याचीच होती. शिवाजी महाराजांनी मोगल राजवटीविरुद्ध प्रथम तेच केले होते. १८७९ च्या फेब्रुवारीत शिवरात्रीच्या मुहुर्तावर रामोशी, मांग इत्यादी लोक आणि काही पांढरपेशे लोक अशा दोन-तीनशे लोकांच्या सेनेसह त्यांनी थामारी गावावर पहिला दरोडा घातला. त्यानंतर त्यांनी घातलेल्या एका मागून एक अशा अनेक दरोड्यांमुळे इंग्रज सरकार चक्रावून गेले.
ब्रिटीशांच्या कह्यात सापडणे
जून १८७९ मध्ये ते गाणगापूरात परतले. नजीकच रहाणार्या रोहिल्यांशी ५०० घोडेस्वारांची नवी सेना उभारण्याचा करार केला आणि पैसे आणण्यासाठी ते पंढरपुरात निघाले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी १५०० हिंदी आणि गोरे सैनिक मेजर डॅनिअलच्या हाताखाली सतत खपत होते. हेरांकडून डॅनिअलला त्यांचा सुगावा लागला. सतत ४२ घंट्यांच्या पाठलागानंतर त्यांना देवरनावडगी येथे २० जुलैच्या मध्यरात्री निद्रिस्त असता अटक करण्यात आली. पकडल्यानंतरही डॅनिअलला द्वंद्वयुद्धाचे आव्हान त्यांनी दिले; पण त्याने ते स्वीकारले नाही. त्यांच्या बंडाच्या माहितीसाठी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. पुण्याच्या सत्र न्यायालयात त्यांच्यासह १६ जणांवर इंग्रज शासनाविरुद्ध ‘सशस्त्र बंड पुकारण्याचा, कट केल्याचा, त्यासाठी माणसे आणि शस्त्रे गोळा केल्याचा, शासनाच्या विरोधात राजद्रोह पसरवण्याचा आणि दरोडे घालण्याचा’ असे आरोप ठेवण्यात आले.
ब्रिटीशांकडून कारागृहात अतोनात हाल आणि मृत्यू
फडकेंच्या स्वप्नाला आणि ध्येयाला पेलेल असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या आद्यक्रांतीकारकांच्या नशिबी जन्मठेप, काळेपाणी, एडनचा कारागृह, तेथे तेलाचा घाणा चालवणे, चक्की पिसणे असे भोग आले. त्यांचे तेथे हालहाल करण्यात आले, मांसाहार करत नाहीत म्हणून उपाशी ठेवण्यात आले. दीड वर्षातच म्हणजे १२ ऑक्टोबर १८८० या दिवशी मध्यरात्री त्यांनी आपल्या बेड्या तोडून, कोठडीची जड दारे उखडून, कारागृह फोडून पलायन केले. ते बारा मैल तसेच पळत होते. दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सोजीर त्यांच्या पाठलागावर निघाले आणि दुपारी ३ वाजता त्यांना वीर आनंद या ठिकाणी पकडून परत कारागृहात आणले. मग जडातील जड बेड्या, एकाकी कोठडी आणि छळ चालू झाला. त्यांचे भीमकाय शरीर खंगत गेले. क्षयाने ते जर्जर झाले आणि वयाच्या केवळ अडतिसाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १८८३ या दिवशी सायंकाळी ४.२० वाजता त्यांनी देह ठेवला.
अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
संकलक : डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
संपर्क क्र. : 9967671027
Be First to Comment