Press "Enter" to skip to content

वृक्षारोपण साठी आणलेली रोपे अद्यापही पडून

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

माथेरान नगरपरिषदेने वृक्षारोपण साठी आणलेली जवळपास शंभर पेक्षाही अधिक रोपे अनेक दिवसांपासून येथील नौरोजी उद्यानात पडून आहेत.लवकरच या रोपांची लागवड केली गेली नाही तर ही रोपे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवर्षी नगरपरिषदेमार्फत पावसाळ्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून विविध प्रकारची रोपे आणली जातात. परंतु एकदा का वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला की त्याकडे कुणी ढुंकूनही पहात नाही त्यामुळे दरवर्षी नाहक पैशाचा चुराडा या माध्यमातून केला जात आहे. माथेरान मध्ये दरवर्षी मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते अनेक जुनी झाडे मुळासहित उन्मळून पडत असतात. याकामी वनखात्याच्या मार्फत सुध्दा वृक्षारोपण करण्यात येत असते त्याची सुध्दा अवस्था तशीच दिसून येते. लाखो रुपयांची रोपे आणून त्यांचे सुयोग्य पद्धतीने नियोजन केले जात नाही. नुकताच काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे जवळपास १६० रोपे नौरोजी उद्यानात पडून आहेत याकडे संबंधीत ठेकेदार अथवा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याने पावसात ही लागवडी अभावी खराब होणार आहेत. जर नगरपरिषदेकडे ही अनमोल किंमतीची रोपे लावण्यास वेळ नसेल तर ती सर्व रोपे येथील वृक्ष प्रेमींना दिल्यास ते उत्तम प्रकारे या रोपांचे संगोपन करतील. निदान यापुढे तरी अशाप्रकारे शासनाच्या पैशाचा गैरवापर न करता त्याची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यास फायदेशीर ठरणार आहे.याबाबत मुख्याधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.असे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.