Press "Enter" to skip to content

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या मागणीची महापालिकेने घेतली दखल

महानगरपालिका क्षेत्रात लॉक डाऊन मध्ये शिथिलता


सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने तीन ते 13 जुलै असा लॉकडाऊन घेतला होता, मात्र या कालावधीतही लॉकडाऊनचा प्रभाव न झाल्याने पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे परंतु सततच्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापार्‍यांवर होणार्‍या परिणामांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने महापालिकेच्या निदर्शनास आणून देत लॉकडाऊन रद्द करावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महानगरपालिकेने लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणत नागरिक तसेच व्यापार्‍यांना दिलासा दिला आहे. लॉकडाउन रद्द करण्याबाबत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने 13 जुलै रोजी महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. मागणीबरोबरच या निवेदनात कोरोना रोखण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्या सूचनांचा ही विचार महापालिकेने केला आहे.
         नवीन सुधारित आदेशानुसार आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यामध्ये अन्नधान्य भाजीपाला आणि फळे बेकरी मासळी चिकन-मटण किराणा दुकाने रोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र खरेदी विक्री करताना शारीरिक दूरी राखणे गरजेचे आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. दूध डेअरीसाठी सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. तसेच चष्म्याची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडे राहतील. स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर बांधकाम साहित्य, स्टील, सिमेंट, पावसाळी प्रावरणे, विक्री, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री, कॉम्प्युटर-मोबाईल, विक्री, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ही दुकाने सोमवार ते गुरुवार या दिवसात सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र ही दुकाने केवळ घरपोच सेवा देवू शकतील. त्यांना काऊंटरसेलची परवानगी देण्यात आलेली नाही.
पिठाची गिरणी रोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर रेस्टॉरंट व किचन यांना सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत पार्सल म्हणजेच घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. वृत्तपत्र विक्रीसाठी सकाळी सात ते संध्याकाळी पाच ही वेळ देण्यात आलेली आहे. लॉकडाऊन मध्ये शिथीलता देत असताना शारीरिक दूरी या नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या मागणीची दखल घेत निवेदनात केलेल्या काही सूचनांचाही विचार केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत तसेच भविष्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करताना सर्वसामान्य नागरिक तसेच हातावर पोट असणार्‍या यांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे असल्याचे मतही अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी मांडले आहे. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या मागणीमुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या शिथिलतेमुळे व्यापारी तसेच नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.