Press "Enter" to skip to content

संकरित भातशेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना फायदा

शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने

सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी ( गणेश मते ) :

शेतकऱ्यांनी भातानंतर भातऐवजी भातानंतर कडधान्य, भातानंतर भाजीपाला ही पीकपद्धती अवलंबून त्याला कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, गांडुळशेती अशा कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड देत एकात्मिक शेतीपध्दती अंगिकारण्याची गरज आहे. अधिक उत्पादन देण्याऱ्या ‘सह्याद्री’ या संकरित भात वाणांचा वापर करून यांत्रिकीकरणाची कास धरत भातावर प्रक्रिया करून त्याचे उपपदार्थ विक्री केल्यास शेतकऱ्यांना भातशेती नक्की फायदेशीर ठरू शकते, असे मत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी व्यक्त केले.

‘कोकणातील भातशेती आणि शेतकरी’ याविषयी त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जत भात संशोधन केंद्राने केलेले कार्य आणि त्यांचा शेतकऱ्यांना झालेला फायदा याबाबतही सांगितले. तसेच कर्जत 1 ते कर्जत 10, कर्जत 184, नव्याने तयार केलेले ट्रॉम्बे कर्जत कोलम आणि कर्जत शताब्दी या सुगंधी भाताविषयी माहिती दिली.

पुढे ते म्हणाले की, गावाच्या शेती विकासासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी समूह शेती हा चांगला पर्याय असून त्याला सरकारी अनुदानदेखील मिळते. तसेच शेतकऱ्यांनी केवळ भात पिकावरच अवलंबून न राहता शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, गांडूळशेती, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसायांची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे भातशेती तोट्यात वाटली तरी पूरक व्यवसायांनी तूट भरून काढणे शक्य आहे, असे डॉ मर्दाने यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेणे आवश्यक
कृषी अधिकाऱ्यांनीही शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. जोपर्यंत अधिकारी शेतकऱ्यांना भेटत नाहीत, तोपर्यंत नवीन तंत्रज्ञान माहीत होणार नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे.

कृषीकर्ज घेताना समस्या
शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेताना मोठ्या समस्या येतात. त्यामुळे सरकारनेही बँकांना कर्ज वाटप, अवजारे वाटप यांचे थेट टार्गेट दिल्यास समस्या निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे विजवितरणनेही अपेक्षित सहकार्य करावे, अशी समस्या शेतकरी सांगतात असे ते म्हणाले.

पडीक जमिनीसाठी सुधारित ड्रमसिडरचा वापर करावा
सुधारित ड्रमसीडरने शेती केल्यास हेक्टरी २३ मजुरांची बचत होते. मजुरीवर होणारा प्रचंड खर्च, मजुरांची अनुपलब्धता, यांत्रिकीकरणाचा अभाव, जमिनीचे तुकडीकरण, अकार्यक्षम सिंचन, खत आणि पीक संरक्षण व्यवस्थापन यामुळे कोकणातील भातशेती आतबट्ट्याची असते. शेती पडीक ठेवण्याऐवजी सुधारित ड्रमसीडरने शेती केल्यास आणि संकरित वाणांचा वापर केल्यास उत्पादनाबरोबर भाताची प्रत सुधारण्यास मदत होईल असा दावा डॉ. मर्दाने यांनी केला.

शेतकऱ्यांची मानसिकता नक्की बदलेल
कर्जत तालुक्यात मागील काही वर्षांपासून ऍग्रो टुरिझम व्यवसाय वाढीस लागला आहे. अनेक शेतकरी त्याकडे वळले आहेत. मात्र, येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांची भातशेतीबाबतची मानसिकता नक्कीच बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यांत्रिक शेतीने शेतकऱ्यांना फायदा
आधुनिक अवजारे आणि बियाणांचा वापर केल्यास कमी खर्चात शेती करणे शक्य आहे. तसेच, यांत्रिक शेती केल्याने खर्च कमी येतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होते आणि उत्पादनही चांगले येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिक शेती केल्यास होणाऱ्या नाहक खर्चात घट होईल, असेही डॉ. मर्दाने यांनी सांगितले.

कडधान्य पिकेही घ्यावीत
कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा विचार करता भात हे एकच पीक न घेता कडधान्य पिकाचा अंतर्भाव शेतीमध्ये होणे गरजेचे आहे. कडधान्य पिकाच्या आहारातील समावेशामुळे डाळीची उपलब्धता होऊन आहार हा परिपूर्ण होणे शक्य होईल. राजमासारख्या अपारंपरिक पिकाचा आणि चवळीसारख्या पिकाचा आहारामध्ये भाजी म्हणून उपयोग केल्यास तसेच ते विक्रीमध्ये असल्यास आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल. सध्यस्थितीत या पिकाखालील क्षेत्र पाहता विविध सहकारी क्षेत्रातून डाळ मिल, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती यासारखे उपक्रम राबविणे हितकारक ठरेल, असेही डॉ. मर्दाने यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.