Press "Enter" to skip to content

उरणकरांना वाली कोण ?

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

कोरोना कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव उरणमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कशा प्रकारे रोखायचा याबाबत शासकीय यंत्रणा जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते प्रयत्न तोकडे पडत आहेत. यासाठी उरणमधील जनतेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने उरणकरांना वाली कोणी नसल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
देशात व राज्यात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातही कोरोना वाऱ्यासारखा पसरत आहे. उरणमध्ये ही परिस्थिती वेगळी नाही. कोरोना आज उरण शहरात व तालुक्यातील गावागावात पसरत आहे. दररोजच्या रिपोर्टमध्ये शहराबरोबर तालुक्यातील अनेक गावांची नावे पॉझिटीव्हीमध्ये झळकताना दिसतात. यावरून उरणमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे उघड होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून त्यावर खबरदारी घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून जनजागृती सुरू आहे. परंतु त्याची अंमलबजावणी हवी तशी होताना दिसत नाही. या परिसरात असणाऱ्या कंपन्यांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहेत. कंपनीत येणारा अधिकारी व कामगार वर्ग हा इतर ठिकाणचा जास्त आहे. त्यांच्या संपर्कात स्थानिक कामगार आल्यानंतर त्यांना याची लागण होऊन संपूर्ण कुटुंबही त्याला बळी पडत असल्याचे दुःखदायक चित्र पहावयास मिळत आहे. यावर निर्बंध आणण्यासाठी कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.
मात्र संबंधित कंपन्यांची नावे आजपर्यंत दिलेलीच नाहीत. उलट सदर कंपन्या कोणताही मुलाजाही न ठेवता बिनधास्तपणे सुरू आहेत. गावात कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर संबंधित भाग सील केला जातो. मग कंपनीत कोरोना पॉझिटीव्ह सापडूनही कंपन्या का सील केल्या जात नाही असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच गेली चार महिन्यापासून अनेकवेळा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. आधीच गेली चार महिन्यापासून ज्या सर्वसामान्यांचे हातावर पोट आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हातावर पोट
असणाऱ्यांचे भूकबळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता महिनाभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागताची तयारी आतापासूनच सुरू होते. परंतु आता परिस्थिती अवघड झाली आहे. यामुळे यावर्षी गणेशोत्सव साजरा होण्याची चिन्हे कमी दिसत आहेत.
आजही लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व बंद असल्याने बाहेरही पडता येत नाही आणि काही खरेदी करता येत नाही. प्रत्येकवेळी कोरोनाची ढाल पुढे केली जात आहे. परंतु त्याबाबत उरणच्या जनतेने कशाप्रकारे कोरोनाचा सामना करावा किंवा प्रादुर्भाव करणाऱ्या कंपन्यां बंद कराव्यात यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे उरणकरांना कोणी वाली आहे असे सध्या तरी दिसत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.