Press "Enter" to skip to content

कोरोनाचा उरण तालुक्यावरील विळखा वाढतोय!


मागील पाच दिवसात तब्बल ६८ नव्या रुग्णांची भर !!


सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उरण तालुक्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळच घालायला सुरुवात केली असल्याचे उरण तहसील कार्यालय आणि रायगड प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आकडेवारीतून स्पस्ट झाले आहे. विशेष म्हणजे साधारण मी जूनमध्ये काही ठराविक गावांपुरतीच मर्यादित असलेली ही महामारी आता तालुक्याच्या ग्रामीण भागात अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली असल्याने गावोगावच्या नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे . मागील अवघ्या पाच दिवसात तालुक्यात ६८ नव्या रुग्नांची भर पडली असून जूनच्या अखेरीस अवघ्या ३० ऍक्टिव्ह रुग्णावर आलेला आकडा मागील अवघ्या पाच दिवसात ६८ ने वाढून तो ९८ वर पोहोचला असल्याने तालुक्यातील नागरिक मात्र कमालीचे हादरून गेल्याचे चित्र आहे. त्यातच तालुक्यात असणारे अनेक केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रकल्प अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कार्यान्वितच असल्याने त्या ठिकाणी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने जाणारे कमालीचे तणावाखाली असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मागील पाच दिवसांतील रुग्णवाढीचा आकडा चार दिवस व्दिआकडीच राहिला आहे तर केवळ एकाच दिवशी तो एक आकडी राहिला आहे . त्यामुळे रुग्णवाढीची ही साखळी अशीच वाढत गेल्यास उरण तालुक्याची स्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका बळावला आहे.
संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने उरणच्या करंजा गावातील सुरकीच्या पांड्याला सुरुवातीच्या काळात विळखाच घातला होता मात्र प्रशासनाने केलेले योग्य नियोजन आणि त्याला गावकऱ्यांनी दिलेली सक्रिय साथ यामुळे करंजा विभागातून कोरोनाला हरविण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यानंतर मात्र तालुकाभरातील कोरोना रुग्नांचा आलेख सातत्याने वाढतच गेल्याचे पाहायला मिळाले असून मागील पाच दिवसात तर याचा विस्फोट होण्याच्या मार्गाने प्रवास सुरू झाल्याची भीती बळावू लागली आहे . मागील पाच दिवसात एकदा १५ , नंतर ४ , त्यानंतर १३ काल पुन्हा १३ आणि आज थेट २३ रुग्ण उरण तालुक्यात सापडल्याचे प्रशासकीय अहवालांतूनच स्पस्ट झाले आहे तर त्या मानाने मागील पाच दिवसात २६ रुग्ण बरे होऊन घरी आले असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे त्यातच आज आणखी एका कोरोना रुग्नाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला उरण तालुक्यात एकूण ३४० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर आजपर्यंत बरे झालेले २३६, सध्या उपचार घेणारे ९८ रुग्ण असल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे या सर्व बाबी पाहता कोरोनाचा उरण तालुक्यावरील विळखा अधिक घट्ट तर होत नाही ना अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.