Press "Enter" to skip to content

२०२० ला निरोप..

२०२० ला निरोप..

मार्च महिना ..रणरणते ऊन आणि त्यात नुकताच लॉकडाऊन सुरू झालेला, दुधवाला, पेपरवाला, कामवालीबाई कुणी कुणी येत नव्हते..अरे आवरा मुलांनो सांगून आई बाबा थकले होते आणि त्यात उकाडा..सगळेजण घामामुळे बेजार आणि बाहेर कुठेही जाता येत नाही म्हणून खुप चिडचिड व्हायला लागली आणि एखाद्या कोंडवाड्यात असल्यासारखे वाटतं होते..
पण जे जेष्ठ नागरिक नेहमी घरात एकटेच राहतात, आजारी पडतात त्यावेळी त्यांची काय अवस्था काय होत असेल याची जाणीव या संकटात प्रकर्षाने झाली.. खरं म्हणजे एकवेळ आनंदाच्या क्षणी माणूस कुणाला विसरू शकतो पण अडचणीत केलेली मदत त्या त्या वेळी लाखमोलाची असते..! अनेक जण या विषाणू संसर्गामुळे कायमचे सोडून गेले, पण बरेचजण सुखरूप घरी पण परतले..! या करोना युद्धात अनेक संस्था व समाजातील नागरीकांनी मदतीचा हात दिला. डॉक्टर्स, नर्सेस, पासून ते सेवाभावी संस्थांनी मोलाची मदत केली..! अशी वेळ स्वतः वर आल्यामुळे त्यांची किंमत कळली. सध्या हळूहळू सर्व कामे व एकुण व्यवहार, हॉटेल पासून मंदिरापर्यंत सगळे पूर्वपदावर येतांना दिसत आहे.
या करोना संकटात सगळ्यांची मने ही ढवळून निघाली आहेत. तुम्ही म्हणाल कसे काय? अहो अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला, जे नाते दूर केले होते त्यांनीच आपुलकीने चौकशी व मदत केली..! मग अखेर नात्याची किंमत समजली, चुका लक्षात आल्या हा बदल केवळ या संकटामुळे होवू शकला.
अनेक कारणांमुळे बरेचजण घरापासून दूर रहात होते. या संकटात आईबाबांच्या आठवणीत, आपण एकटे आहोत ही भावना व वडीलधाऱ्यांची किंमत कळाली.
नोकरीनिमित्त दूर देशी असलेल्या पतीच्या काळजीने धास्तावलेली पत्नी व मुले, त्यांची आठवण, वाटणारी हुरहुर, या संकटात पाहिजे असलेला त्यांचा आधार, व किंमत सगळे काही उमगले केवळ या संकटामुळेच!
घराच्या बाहेर पडायचे नाही म्हणून गेली १० महिने सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल होवून अॉनलाईन शाळा व डिजिटल पद्धतीने कामे सुरू झाली, व मोठ्या कंपन्याच्या उत्पादनात उलट आधीपेक्षा झपाट्याने वाढ झाली. विशेषतः भाजी , किराणा, घरगुती पद्धतीचे घरपोच जेवण अशा व्यवसायाला या डिजिटल माध्यमाचा जास्त प्रमाणात फायदा झाला, यापुढे आता आपल्याला या नवीन तंत्रज्ञानाचा वापर व डिजिटल माध्यमाची ओळख करून त्यातील बारकावे समजून घेणे, शिकणे गरजेचे झाले आहे. कारण दररोज पेपरमध्ये फसवणुकीच्या बातम्या वाचायला मिळतात आणि आजूबाजूला कितीतरी घटनाही घडतं आहेत. या संकटामुळे देशाची आर्थिक घडी जरी विस्कटली, अनेकांच्या व्यवसाय व नोकरी बंद पडली तरीही अनेकांना तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवसाय सुरू करता आला.
या डिजिटायझेशनमुळे देशाचे आर्थिक नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी झाले.
अनेक वर्षापासून चालत आलेल्या लग्न परंपरा, केला जाणारा अफाट खर्च व निमंत्रितांची संख्या यावर देखील करोना काळात चांगलाच लगाम बसला, बंधने आली. अनेकांची जी ठरलेली लग्न होती, ती मोजक्या संख्येने छान पार पडली, तर करोनाकाळात बऱ्याच जणांनी झटपट लग्न ठरवून अत्यंत कमी खर्चात लग्न लावून समाजात एक आदर्श निर्माण केला. नाहीतर मुलीचे लग्न करून देणे, हे प्रत्येक वडिलांसाठी खूपच कष्टदायक असते. मुलीचे लग्न थाटामाटात लावून द्यायचे व इतर मुलांकडून असलेल्या अपेक्षांनी घर, शेती, विकायची वेळ येते व कर्ज फेडण्यात आयुष्य निघून जात..! म्हणूनच थोडक्यात साधेपणाने, कमी संख्येने लग्न लावण्याची ही प्रथा, विचार व झालेला बदल खूप स्वागतार्थ असा आहे.
अशा अनेक गोष्टीं व अनेक चांगली शिकवण या २०२० ने आपल्याला करून दिली. खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन या कठीण काळात सगळ्यांनाच झाले. काही कटूगोड आठवणी, काही चांगले व वाईट अनुभव आले त्यातल्या फक्त चांगल्या आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन! नव्या आशा आकांक्षा ,सुख व समृद्धी घेऊन..नवी शिकवण व नव्या परंपरांना यापुढेही कायमच टिकवून ठेवू या.
संकट अजून संपलेले नाही म्हणून नव्या वर्षाचे स्वागत घरात राहूनच..तेही कमीत कमी संख्येने व साधेपणाने करु या. हाताची स्वच्छता व 2 फुटाचे अंतर ठेवून..काळजी घेवु..व नव्या उमेदीने कामाला लागू या!
अशावेळी एक जुने गाणे आठवतेय..भले बुरे ते घडून गेले.. विसरून जावू सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर..
अशा या न भुतो न भविष्यति वर्षाचा निरोप घेऊन आपण २०२१ या नवीन वर्षाचे स्वागत करू या.

मानसी जोशी, खांदा कॉलनी, पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.