Press "Enter" to skip to content

लॉंऽऽऽग विकेंड

लॉंऽऽऽग विकेंड

नवीन वर्षाचे कॅलेंडर(म्हणजे आपले कालनिर्णय हो! मराठी माणसाने कालनिर्णय घेणे हे शास्त्रात लिहिलेले आहे ) हातात आले की काहीजण संकष्टी, एकादशी गणपती दिवाळी कधी येतेय हे पहिले पाहून घेतात.
काहीजण आपला, बायको, मुलेबाळे वगैरेंच्या वाढदिवसाच्या तारखांवर खुणा करून ठेवतात. (उगाच विसरायला नको)
काहीजण लॉंग विकेंड्स कधी आहेत किंवा एखादी सुट्टी टाकून तीनचार दिवसांची सलग सुट्टी कधी घेता येईल? हे पहात असतात…
आम्ही पण त्यापैकी एक होतो . हो आता होतोच म्हणायला लागेल…

त्याचं असं झालं. काही वर्षांपूर्वी झरत्रुष्ट्राच्या कृपेने पारसी नवीन वर्ष शनिवार रविवारला जोडून आले. सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने आम्ही महाबळेश्वरला जायचे ठरवले. शुक्रवारी पहाटे लवकर म्हणजे साडेपाचला निघायचे. अकराच्या सुमारास आम्ही पाचगणीला मॅप्रोत असू. अगदी ट्रॅफिक असले तर एखाद तास जास्तीचा लागेल. महाबळेश्वरला जाताना मॅप्रो गार्डनला जायचे हे म्हणजे वारीला जाऊन विठोबाचे दर्शन घेण्याइतके मस्टच आहे. (वारकरी एकवेळ कळसाचे दर्शन घेण्यात समाधान मानेल पण आमचा शाळकरी मॅप्रोतले ते पोटाला आणि खिशाला धडकी भरवणारे सॅंडविच आणि स्ट्रॉबेरी शेक विथ आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय समाधान पावतच नाही.)
मग काय एखाद तासात महाबळेश्वरला जाता येईल. मस्त झोप काढून फ्रेश झालो की सनसेट पॉईंटला जायचे. जमलेच तर बाजारात भटकायचे असे मनसुबे रचत आम्ही गुरुवारी बॅगा वगैरे आधीच पॅक करून वेळेवर झोपायला गेलो. माझ्या सवयीप्रमाणे मी थोडे खाकरे, दाण्याची चिक्की, सफरचंद, मावा केकची पाकिटे व, चणे दाणे आणि पाण्याच्या दोन लिटरच्या बाटल्या अशी एक बॅग भरून घेतली होती. ” आपण जंगलात किंवा निर्जन ठिकाणी जातोय का? तिथले गरम गरम काहीतरी खायचे का हे पदार्थ खायचे? इती बाबा.” मम्मा मी यातले काहीही खाणार नाही हं. नाहीतर तिकडे भूक लागली म्हणून काही मागवायचे ठरवले की तू मला हेच खायचे कंपल्शन करशील. आधीच सांगून ठेवतोय.” वगैरे वगैरे नेहमीचेच यशस्वी तरीही घिसेपीटे संवाद सवयीने कानाआड करत मी न्यायच्या सामानात खाऊची बॅग ठेवलीच.
शुक्रवारी बरोबर साडेपाचच्या ठोक्याला” गणपती बाप्पा
मोरया “असे म्हणत आमची गाडी पनवेलच्या बाहेर पडली. नवरा मिलिट्री मॅन नसला तरीही वेळाच्या बाबतीत त्यांच्या इतकाच वक्तशीर असल्याने आमचे साडेपाच साडेपाच वाजताच वाजले. निघायला उशीर झाला की बाबाचा जमदग्नी आणि दुर्वास याचे कॉंबिनेशन होतो हे आमच्या लेकाला पक्के ठाऊक असल्याने तो देखील वेळेआधी तयार होऊन बसतो.तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही वेळेत बाहेर पडलो. महाड मार्गे जायचे का असाही एक विचार नवऱ्याच्या मनात येऊन गेला. तेव्हा गुगलमॅप रस्त्यावरचे ट्रॅफिक किती आहे याचा अंदाज देत नव्हते. त्यामुळे गुगलला विचारणे हा पर्याय उपलब्ध नव्हता. पण एक्स्प्रेसला जास्त वेळ अडकून पडायला होणार नाही असा विचार करून आम्ही पुण्याच्या मार्गाने जायचे ठरवले. एक्स्प्रेसवेला लागलो तेव्हा साधारण पावणेसहा वाजले होते. रस्त्यावर वाहने नेहमीपेक्षा जास्तच दिसत असली तरी गाड्या वेगाने जात होत्या. So far so good असा विचार करत आम्ही पुढे जात राहिलो. साधारण सव्वासहाच्या सुमारास पहिल्या टोलपासून एखाद किलोमीटर आधीच आम्हाला टोल भरण्याच्या गाड्यांच्या रांगा दिसून आल्या. आम्हीपण त्यातल्या एका रांगेत शिरलो. टोलनाक्यावर एक अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. नेमके एखादी रांग लवकर पुढे सरकतेय असा विचार करून आपण त्या रांगेत शिरलो की आजूबाजूच्या गाड्या पटापट पुढे जातात आणि आपली रांग मुंगीच्या गतीने पुढे जाते. न्यूटनच्या लॉ प्रमाणे हे देखील त्रिकालाबाधित सत्य आहे. आत्ता टोल नाका दिसेल मग दिसेल असा विचार करत आम्ही आलीया रांगेसी सामोरे गेलो होतो. रांगेतच आम्ही सुर्योदय पाहिला. साधारण साडेसातला आम्ही पहिला टोल पार केला. दुसऱ्या टोलला तर त्यापेक्षाही जास्त रांग होती. आत्तापर्यंत गाढ झोपलेला लेक खडबडून जागा झाला. फुडमॉल आला का? मला जायचय,असे म्हणत त्याची करंगळी वर झाली. थोडावेळ थांब आता टोल पास केला की फुड मॉल येईल. असे म्हणून मी त्याला थांबायला सांगितले. पण ज्या गतीने गाड्या चालल्या होत्या त्या गतीने अजून काही वेळ त्याला धीर धरावा लागणार होता. शेवटी साडेनऊ च्या सुमारास आम्ही दुसरा टोल पास केला.गाडी फुड मॉलजवळ आल्या आल्या वेगाने माझा लेक वॉशरुमकडे धावला. सगळीकडे प्रचंड गर्दी होती.अख्खी मुंबई बाहेर पडली असावी असे वाटत होते. खाण्यासाठी टोकन घ्यायचे तिथे इतकी मोठ्ठी रांग लागली होती की, “जाऊदे आपण खाकरे आणि चिक्की वगैरे खाऊ. फक्त चहा घेऊ.” बाबा उवाच. आणि मला कोल्ड्रिंक!!” अर्थातच लेक उवाच.. गालातल्या गालात हसत मी गाडीकडे वळले. आम्ही गाडीतला खाऊ खाऊन मार्गाला लागलो. पुण्याला पोचेपर्यंत ट्रॅफिक ठीक होते. पुढे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!! गोगलगायीच्या गतीने गाडी सुरू होती. नशीब लेकाने त्याची आवडती पुस्तके बरोबर आणली होती आणि गाडीत आमच्या आवडीच्या गाण्यांच्या आणि मुख्य म्हणजे पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीच्या सीडी होत्या. त्यामुळे मला बोर होतय. आता मी काय करू? अशी भूणभूण सुरू नव्हती.
सकाळची दुपार झाली. दोनच्या सुमारास आम्ही साताऱ्याजवळ आलो. तिथेच एक बरेसे हॉटेल बघून जेऊन घेतले. हॉटेलमध्ये देखील न आवरता येण्याइतकी गर्दी होती. त्यामुळे बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जेवण मिळाले. तरी बरं जेवणाला उत्कृष्ट चव होती. तासाभराने आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. सातारा ते वाई अंतर पोचायला आणखी दीड तास लागला. नवरा पण क्लचब्रेक क्लचब्रेक करून कंटाळला होता. वाईला गणपतीचे दर्शन घेतले. जरा पाय मोकळे केले तोपर्यंत सहा वाजले होते. आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय याची माहिती महाबळेश्वरच्या रिसॉर्ट वाल्याला मी दिली. न जाणो आम्ही येतच नाही असे वाटून आमचे बुकिंग कॅन्सल केले तर. मॅडम तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमची रुम कोणालाही देणार नाही. फक्त महाबळेश्वरच्या जवळ आलात की कळवा आम्ही जेवण तयार ठेऊ. असे आश्वासन मला मिळाले आणि मी निश्चिंत झाले.
आम्ही वाईच्या गणपतीमंदिराच्या परिसरात सूर्यास्त पाहिला. कुठूनही पाहिला तरी सूर्यास्त तेवढाच देखणा वाटतो हे मात्र खरं.
मजलदरमजल करीत रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही महाबळेश्वरला पोचलो एकदाचे.रिसॉर्टवाल्यांनी गरमागरम जेवण अगदी तय्यार ठेवले होते. जेवून आम्ही जे झोपलो ते दुसऱ्या दिवशी आठला उठलो. सूर्योदय स्वप्नातच पाहिला.
त्या दिवशी महाबळेश्वरमध्ये जिथे जाऊ तिथे गर्दीचा समुद्र होता. बोटिंगसाठी खूप गर्दी, प्रत्येक पॉइंटवर गर्दी, क्षेत्र महाबळेश्वरच्या देवळात गर्दी, बाजारात तर अती गर्दी.. आमच्या ओळखीचेही अनेक चेहरे त्या गर्दीत दिसत होते. आपण जी चूक केलीय ते इतरही करताना बघून थोडं बरही वाटत होते. इतका वैताग येत होता तरीही हसरे चेहरे ठेऊन त्यातल्या त्यात जमले तेवढे फोटो काढून enjoying long weekend अशी टॅगलाईन टाकून फेसबुकवर अपलोड केले. (तशी प्रथाच आहे त्याशिवाय पिकनिक पूर्ण होत नाही यू नो.)
मामा चणेवाले, पल्लोड साडी, बाजारातल्या ज्यूटच्या पिशव्या, लेकासाठी हॅट, काही खेळणी अशी नेहमीची ठिकाणं त्यातल्या त्यात साधून आम्ही आमच्या रुममध्ये परतलो. उरलेला दिवस टिव्हीवरचे बदलणारे चॅनल बघण्यात आणि एकमेकांशी रुममध्येच गप्पा मारण्यात घालवला. तरी बरं रिसॉर्टला स्विमिंग पूल होता आणि इतर गेम्सची पण सोय होती. त्यामुळे आमचा लेक जरातरी एंजॉय करू शकला.
तिसऱ्या दिवशी परत तोच द्राविडी प्राणायाम करत रात्री आम्ही घरी पोचलो. सोमवारी अधिकच दमलेले आणि कंटाळलेले आम्ही “महाबळेश्वरला काय मजा आली. एकदम फ्रेश वाटतय” असा मुखवटा धारण करून कामाला लागलो.

या ट्रीपचा एक नाही दोन फायदे झाले. परत आम्ही कधीही लॉग विकेंडला बाहेर फिरायला गेलो नाही आणि ट्रीपला मी खायचे पदार्थ नेते याबद्दल मला कधीही ऐकून घ्यावे लागले नाही.

तळटीप – : हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे की नाही हे तुम्हीच ठरवा कारण तुम्ही पण हे सारे थोड्याफार फरकाने अनुभवले असेलच 😄😄😄)

डॉ. समिधा गांधी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.