Press "Enter" to skip to content

शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठकीत संघटनेच्या बळकटीकरणाचा हुंकार

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने स्थापन झालेल्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाची बैठक पालिपोटल येथील सुमंगलादेवी मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडून चिरस्मरणीय ठरली. शेतीशी निगडित विविध समस्यांवर उहापोह होत असताना टाळ्या, हंशा, आक्रमकता, त्वेष,संताप व आनंद अशा बहुढंगी स्वरूपाच्या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून उत्पन्न वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण होण्यासाठी संगठन बळकट करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी कर्जत तालुक्याच्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख होते. यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे भात विशेषज्ञ डॉ. रमेश कुणकेरकर, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ तसेच मंचाचे समन्वयक डॉ. रवींद्र मर्दाने, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील, कृषिविद्यावेत्ता डॉ. अनंत दळवी, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एन. एस. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर कसबे, आदिवासी विकास विभागाचे माजी उपायुक्त विकास देशमुख, सिडकोचे माजी कार्यकारी अभियंता रमाकांत झुंझारराव, वनपाल पी. वी. बागल, कृषी विभागाचे दत्तू देवकते इ प्रामुख्याने उपस्थित होते.

चर्चेत भाग घेताना निलिकेश दळवी यांनी मूल्यसंवर्धनाचे महत्व प्रतिपादित करीत विविध प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची व भाजीपाला विक्रीसाठी कर्जतला स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सुजल ऍग्रोचे निलेश पाटील यांनी सीएमएजीपी व पीएमएजीपी योजनेची माहिती देत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

डॉ. कसबे यांनी शेळीपालन व कुक्कुटपालन कसे फायदेशीर आहे, हे पटवून दिले. डॉ. दळवी यांनी मका व मधूमका तसेच डॉ. पुष्पा पाटील यांनी मश्रुम उत्पादन अधिक नफा देणारे असल्याने त्याकडे वळण्याचे आवाहन केले. बबन गुरव यांनी फुलशेती, कृषी पर्यटन व मत्स्य संवर्धन कसे आर्थिकदृष्ट्या बळकट करू शकतात, हे सोदाहरण स्पष्ट केले. शेतकरी नेते दशरथ मुने यांनी भात खरेदी केंद्रात चालणाऱ्या दांडगाईच्या सुरस कथा विदित केल्या. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही भात खरेदी वेळेवर सुरू नाही, पिशव्या उपलब्ध होत नाही, व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकरी नाडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या अनागोंदी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी लवकरच उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले. काही शेतकरी व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून शेतीचे उतारे त्यांना उपलब्ध करून देतात, त्यामुळे एकीकडे प्रामाणिक व कष्टकरी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे व्यापारी गब्बर होत आहेत.

यासाठी शेतकऱ्यांनीसुद्धा नैतिकता जोपासण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. श्री अशोक पाटील यांनी पपया, तोंडली व काकडी लागवडीतून मिळविलेल्या समृद्धीची यशकथा विदित करीत शेतकऱ्यांच्या खिशात दररोज पैसे येण्यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाकडे वळण्याची गरज प्रतिपादित करीत शनिवार व रविवारीही पशुवैद्यकीय दवाखाने सुरू राहायला हवे, अशी मागणी केली. अण्णा पवार यांनी रब्बी हंगामात भात खरेदी वेळेवर सुरू करण्याची मागणी केली. कुंभार, अण्णा पवार, रमण पाटील यांनी अंडे उबविणाऱ्या इंक्युबेटर मशीन तसेच कोंबडीच्या विविध जातींची एक दिवसाची पिल्ले उपलब्ध करून देण्याची मागणी केली. लक्ष्मण लोहकरे यांनी भातशेतीसह भाजीपाला, कडधान्य लागवड तसेच शेळीपालनातून मिळालेल्या समृद्धीची यशकथा विदित करीत जिताडा मासे रुपये 900/- प्रतिकिलो प्रमाणे विकल्याचे नमूद केले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तारतम्याने वागून, गोड बोलून योजना कशा मिळविल्या याचे अनुभव ते गावठी भाषेत सांगत असताना श्रोत्यांत हास्याचे फवारे उडाले. याचे अनुकरण शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन करताच पुन्हा हास्यकल्लोळ झाला. पंढरीनाथ दाभाडे यांनी फळझाडे उपलब्ध करण्याची मागणी केली. व्ही. एस टी. टिलर्स ट्रॅक्टर लिमिटेडचे महाव्यवस्थापक विपणन मनीष सोमैया यांनी शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या यंत्रांची माहिती देत शेती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी यांत्रिकीकरणाची गरज प्रतिपादित करीत त्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

वनक्षेत्रपाल पाटील यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देत लाडीवली येथील नर्सरीत एक लाख वीस हजार रोपे शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक वृक्षांची लागवड करावी, असे ते म्हणाले. ह. भ. प.भरत महाराज देशमुख म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातही पशूंसाठी लागणारी औषधे सहज व विनामूल्य उपलब्ध व्हायला हवी. पशुपालकांना अव्वाच्या सव्वा किमतीत औषधे विकत घ्यावी लागत असल्याने तो नाडला जात आहे, अशी खंत व्यक्त करीत शेतकऱ्यांनी संघटित होणे, काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. शेतकरी नेते चंद्रकांत मांडे यांनी आक्रमक शैलीत शासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर आसूड ओढले. प्रमुख अधिकारी बैठकीला यायचे हेतुपुरस्सर टाळतात.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाठवून जबाबदारी झटकतात व कामास मुद्दाम विलंब लावतात. अशा कामचुकार आणि कर्तव्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाही होणे गरजेचे आहे. महसूल विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना तुच्छ लेखून तासनतास बाहेर बसवतात, दोन-तीन शेतकऱ्यांनाच केबिनमध्ये प्रवेश देतात, मगृरीची भाषा वापरतात, शासकीय अधिकाराला बापाची जहागीर समजतात. त्यांचे वागणे अशोभनीय व शासकीय धोरणाला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे जिल्हा व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी तसेच मंत्र्यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने दखल घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. चक्रीवादळ तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. लेखी तक्रारींचीही दखल घेतल्या जात नाही. काही अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहे.

झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कारवाही व्हायला हवी, यासाठी मजबूत संघटन होणे आवश्यक आहे. डॉ कुणकेरकर यांनी एस. आर. टी. शेतकरी सतीश म्हामूनकर यांच्या प्रश्नाला उत्तर देत कर्जत -९ या वाणाची माहिती दिली व शेतकऱ्यांच्या गरजेनुसार भात बियाणे विकसित करण्यासाठी संशोधन केंद्र कटिबद्ध असल्याचे सांगितले.
वि. रा. देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादकता व उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या अनेक आहेत पण वाली कोणीही नाही. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची, संघटित होण्याची व शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे.

डॉ.रवींद्र मर्दाने यांनी एकात्मिक शेती पध्दतीची गरज प्रतिपादित केली. वि. रा. देशमुख यांच्या 97 व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या वैभवशाली जीवनकार्यावर प्रकाश टाकीत आजच्या युवकांसाठी त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी वि. रा. देशमुख यांचा शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या वतीने शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके आयोजन व आभार प्रदर्शन डॉ रवींद्र मर्दाने यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.