१२ डिसेंबर १९१०
मुंबईतील “हार्बर लाइन” व्यावसायिक दृष्टया कुर्ला ते रे रोड दरम्यान चालू झाली.
भारतीय रेल्वेची तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेची सुरुवात ब्रिटीशांनी भारतात आणि आशिया खंडात १८५३ साली केली. बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी )लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी चार डब्यांची असलेल्या ईएमयु लोकलला तेव्हाचे मुंबईचे गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांनी हिरवा कंदील दाखविला होता. ही लोकल व्हीटी ते कुर्ला अशी हार्बर मार्गावर धावली. त्याला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आणि १९२५ सालात दररोज १५० फेऱ्या होऊ लागल्या. फेऱ्यांमधून रोज २ लाख २० हजार प्रवासी प्रवास करत होते. मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर या लोकल फेऱ्या टप्प्याटप्याने वाढविल्या. १९२५ मध्ये चार डबे, १९२७ मध्ये आठ डबे, १९६३ मध्ये नऊ डबे आणि थेट २०१६ मध्ये बारा डब्यांची लोकल हार्बर मार्गावर धावू लागली आहे.
रे रोड हे नाव मुंबईचे गवर्नर (१८८५-१८९०) असलेले लॉर्ड रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले होते.पुढे १९२५ मधे हार्बर लाइन बोरीबन्दर स्टेशनला जोडली गेली, यासाठी सैंड्हर्स्ट रोड आणि डॉकयार्ड रोड यांदरम्यान एलिवेटेड स्टेशन उभारण्यात आले. तोपर्यंत प्रवाशांना रे रोड पासून बोरीबंदर अर्थात व्हिटीपर्यन्त अंतर कापण्यास ट्राम वापराव्या लागत. डॉकयार्ड रेल्वे स्थानक माझगाव डॉकमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सोयीचे आहे. हे रेल्वे स्थानक माझगावचाच एक भाग आहे. शिवाय भाऊच्या धक्क्यावर जाणाऱ्या लोकांसाठीही हे स्थानक महत्वाचे आहे. हार्बर लाईन फक्त दुहेरी लोहमार्गाची असल्याने यावर जलद लोकल चालवता येत नाहीत. मेन लाईन आणि हार्बर लाईन सीएसटीपासून सॅन्डहर्स्ट स्थानकापर्यंत एकमेकांना समांतर जातात आणि पुढे एलव्हेटेड स्थानकांच्या साहाय्याने हार्बर लाईन पुढे जाते.
पुढे 1994 साली हार्बर लाइन मानखुर्द पर्यंत वाढवण्यात आली.त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाशी बेलापूर आणि पनवेलपर्यंत हार्बर लाइन चे प्रस्थ पोहोचले.ठाणे-बेलापूर पट्ट्यातील औद्योगिक वसाहतीचे वाढते स्वरूप पाहता वाशी ते ठाणा अशी ट्रान्स हार्बर लाइन देखील आता कार्यान्वित झालेली आहे. याच हार्बरलाईनची आणखीन एक ट्रान्स लाईन नवी मुंबईतून थेट उरण तालुक्यात देखील घुसणार आहे. तुर्तास रेल्वेची ही लाइन खारकोपर पर्यंत कार्यान्वित करण्यात आलेली आहे उलवे नोड मधील लाखो प्रवाशांना ह्या ट्रान्स लाईन चा फायदा होत आहे.
Be First to Comment