दत्त जयंती निमित्त भरते दरवर्षी मोठी यात्रा. मात्र यावर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द.
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण शहरात असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र दत्त मंदिर देऊळवाडी, उरण शहर येथील यात्रा वाढत्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1), (3) च्या मनाई आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू मुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, नवी मुंबई शहरात गतीने, अतिवेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू (Covid -19)चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13/3/2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केले आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आदेश संदर्भ 1, 2 अन्वये अधिसूचना जारी करून लोकडाऊन आदेशाची मुदत 30/11/2020 पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु संदर्भ क्रमांक 3 अन्वये सदरची मुदत 31/12/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येऊ नये तसेच सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे अश्या प्रकारचे कोणतेही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास विषाणूंचा संसर्ग व प्रार्दुभाव पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नवी मुंबई पोलीस सह आयुक्त डॉ जय जाधव यांच्या आदेशाअन्वये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात परिमंडळ 2 या क्षेत्रात/हद्दीत मोडणाऱ्या उरण तालुक्यात फौजदारी दंड संहिता कलम 144(1),(3) अन्वये उरण मधील देऊळवाडी येथील दत्त मंदिराची यात्रा रद्द करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली. दत्त जयंती निमित्ताने होणारे भजन, कीर्तन, प्रवचन, भक्तिगीते गायन आदी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने ते साजरा करता येणार नाही. मात्र भगवान दत्ताचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांना मंदिर खुले असेल. सोशल व फिसिकल डिस्टन्स पाळून, शासकीय नियम पाळून भाविक भक्तांना दर्शन घेता येणार आहे. दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सर्वांनी मास्क वापरावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये. दत्त जयंती निमित्त उरण मध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नये असे आवाहन उरण पोलीस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी नागरिकांना केले आहे.






Be First to Comment