Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाईव्ह विचार कट्टा

लेखक अँड संदीप बागडे यांचा विशेष लेख वाचा “आत्महत्या हा शेवटचा पर्याय आहे का?”

मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म मानला जातो. कारण इतर प्राण्यांनाही जन्म आहे परंतु ते माणसा सारखं ऐशोआराम उपभोगू शकत नाहीत. तसेच ते माणसा सारखं बोलू शकत नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे ते ईश्वरी सेवा किंवा परमार्थिक कार्य करू शकत नाहीत. चौऱ्यांशी लक्ष योनीचा फेरा चुकवण्याची सुवर्णसंधी ईश्वराने फक्त मनुष्याला दिलेली आहे. मात्र मनुष्य हा भौतिक सुखात गुंतलेला असून त्याला ईश्वराची ओळख नसल्याने त्याचे मनोबल उंचावलेले नाही. त्यामुळे त्याच्याकडे विवेक नसल्याने तो छोट्या छोट्या गोष्टीवरून हतबल होत असतो.

प्रत्येक माणूस स्वप्नातील दुनियेप्रमाणे आपली स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र संचीतापुढे व नशिबापुढे तो काहीच करू शकत नसतो. त्याच्या अपेक्षा वाढत असल्याने त्याला स्वतःचं एक वेगळं विश्व असावं तसेच मान - सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, गाडी, बंगला, इस्टेट या सर्व गोष्टींसाठी तो जिवाचा आटापिटा करत असतो. आपण सर्वश्रेष्ठ असावं यासाठी तो प्रयत्नशील असतो व त्यात तो अपयशी झाला तर त्याच्या मानसिकतेचे खच्चीकरण होते.

पूर्वसंचिताने एखाद्याला इतकं दुःख व यातना असतात की तो कोणाला दाखवत नसतो पण त्याचं दुःख त्यालाच माहित असतं. त्याला माहित असतं की ज्याला आपण दुःख सांगतो तो आपल्या समाधानासाठी रडून ऐकतो व आपल्या मागे हसून दुसऱ्यांना तेच सांगत असतो. अशावेळी मनातील असह्य भावना तो मनातच दाबून ठेवत असतो. व त्या भावना व्यक्त न झाल्याने त्या त्याचं जगणं मुश्किल करून टाकतात. तसेच जेव्हा त्या माणसावर वाईट वेळ व प्रसंग येतात तेव्हा तो ज्यांना आपलं समजतो तेच त्याला परकेपणाची जाणीव करून देतात. शेवटी नैराश्य येऊन त्या व्यक्तीला जग सोडण्याची इच्छा होते. तो माणूस सर्वांसमोर हसतमुख असला तरी त्याला दुःखाची झळ किंवा अपयश मनातून स्वस्थ बसून देत नाही.

वास्तविक हे सुंदर जग सोडण्याची किंवा आत्महत्या करण्याची कोणालाही हौस नसते. मात्र त्याला आपण या जगात एकटे पडलो आहोत व आपलं कोणीच राहिलं नाही याची जाणीव अंतर्मनात सतत होत असल्याने तो आत्महत्येस प्रवृत्त होत असतो. आपली असलेली माणसं परकी झाल्याची त्याला जाणीव होत असते. परंतु त्याची सहनशीलता संपली की त्याला जगण्यात काही अर्थ राहिला नाही अशी भावना मनात घर करते व नाईलाजाने तो कोणत्याही प्रकारे आत्महत्या करीत असतो. मात्र आत्महत्ये नंतर त्याचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे याचा त्याला विसर पडलेला असतो.

“आत्महत्या”

हौस नसते कोणाला आत्महत्या करण्याची
सुंदर जग असताना हे जग सोडण्याची
भीती असते त्याला एकटे असण्याची
इच्छा होत असते त्याला मरण्याची…

सहनशीलतेचा त्याच्या होत असतो अंत
आपलेच परके झाले याची त्याला खंत
उसंत नसते त्याला शांत बसण्याची
इच्छा होत असते त्याला मरण्याची…

पैसा संपत्ती नको त्याला, हवा असतो आधार
आपल्यांच्या परकेपणामुळे होतो तो निराधार
ताकद उरली नसते त्याला लढण्याची
इच्छा होत असते त्याला मरण्याची…

पेच प्रसंग उभे राहता कसा करी तो सामना
शुभेश्च्या न देई कोणी, ना करी मनोकामना
सवय राहीली नाही त्याला आता हसण्याची
इच्छा होत असते त्याला मरण्याची…

कोण नसतं कोणाचं याची झाली त्याला जाणीव
हक्काच्या माणसांची भासली त्याला उणीव
सवय झाली त्याला आपल्यांच्या डसण्याची
इच्छा होत असते त्याला मरण्याची…

अशावेळी गरज असते त्याला धीर देण्याची
आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याची
ही वेळ आहे न खचता उभे राहण्याची
इच्छा होणार नाही त्याला मरण्याची… एखादा माणूस आत्महत्येस का प्रवृत्त होतो व त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा कोणीही विचार करत नसतो. त्यामुळे आपल्या देशात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या ही किड या समाजाला लागली असून ती या समाजाची व्याधी बनली आहे. त्यासाठी चिंताग्रस्त असलेल्या व्यक्तीला बोलतं करणं व त्याची व्यथा जाणुन घेणे व त्याला धीर आधार देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणे ही काळाची गरज आहे.

✍🏻 ॲड. संदीप गोपाळ बागडे
पत्ता – रा. शेलू, ता.कर्जत, जि.रायगड.
मोबाईल नं. ९८६०६२६२४६

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.