Press "Enter" to skip to content

जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव : भारताला प्रथमच मिळालेला सन्मान

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर…!

सिटी बेल लाइव्ह । सोलापूर

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. केवळ आपला वर्ग हीच शाळा न मानता आपल्या वर्गातल्या अनेक मुलांना जगातल्या अनेक देशातील अनेक शाळांतील मुलांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडून त्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल करणं हे मोठं काम डिसले सरांनी केलं आहे. तसंच, QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाचीही दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसले गुरुजींचं फोन करुन केलं अभिनंदन

युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबलटीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे दूरध्वनीवरून केले अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी डिसले गुरुजींचं कौतुक केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांचेकडून रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा 1- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे डिसले यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असं राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसेच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचंही उपमुख्यमंत्री म्हणाले.

तुमचा प्रत्येक भारतीयाला अभिमान : जयंत पाटील

“सोलापूरमधील माढा तालुक्यातील डिसले गुरुजींचं ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुमचा आम्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय. तुम्ही असेच प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी राहा.” , असं म्हणत जयंत पाटील यांनी डिसले गुरुजींचं अभिनंदन केलं आहे.

… आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे : सुप्रीया सुळे

“युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्कारासाठी या वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!”, असं म्हणत सुप्रीया सुळे यांनी रणजीत डिसले गुरुजींचं अभिनंदन केलं आहे. पुढे बोलताना “ग्लोबल टीचर अवॉर्ड”साठी रणजितसिंह डिसले यांची निवड झाली, याबद्दल आम्हांला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांची यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!” असं राष्ट्रवादी नेत्या सुप्रीया सुळे म्हणाल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.