Press "Enter" to skip to content

माथेरानच्या विकासाची कामे पारदर्शी असावीत ! स्थानिकांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठया प्रमाणात इथे कामे पूर्ण केली जात आहेत. तर अनेक विकास कामे पूर्ण करतांना त्यात काही त्रुटी आहेत का याबाबतीत जराही बारकाईने लक्ष केंद्रित केले गेले नाही त्यामुळे अल्पावधीतच केलेली कामे ही डबघाईला येणार असून आजपर्यंत जो काही प्रशासनाने खर्च केला आहे तो एकप्रकारे गंगाजळी गेल्याचा प्रत्यय समस्त नागरिकांना पहावयास मिळणार आहे.
काही ठिकाणी वैशिष्ट्य पूर्ण अनुदानातून कामे पूर्ण केली जात आहेत तर काही ठिकाणी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करीत आहेत परंतु ज्या ज्या ठेकेदारांना कामे दिली जात आहेत त्यांच्या एकंदरीत कामांत काहीच तथ्य दिसून येत नाही. केवळ कामाचा सपाटा लावण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. बहुतांश कामे ही आजही अपूर्णावस्थेत असून मुदत संपून गेली तरीसुद्धा ही कामे मुदतवाढ देऊन पूर्ण करण्यासाठी खटाटोप सुरू आहे.ठेकेदारांना का पाठीशी घातले जाते हे सुध्दा एक कोडे बनलेले आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे होत असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध करून देखील त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते ही खरोखरच शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.सत्ताधारी गटाने मागील काही महिन्यांपासून विकास कामे सुरू केली आहेत तेव्हापासून नगरपरिषदेत मनमानी कारभार सुरू असल्याचे नागरिक उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. एखादया कामांवर सत्तेतील नगरसेवकांनी आक्षेप घेतला तरीसुद्धा त्यावर काहीच चर्चा न करता सरसकट कामात चालढकल करून निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत.वारेमाप पैशाची उधळपट्टी सुरु असून केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी की काय एवढी मोठी कामे सर्रासपणे होत आहेत यावर संबंधित अभियंत्यांना सुध्दा काहीच त्रुटी दिसत नाहीत हे आश्चर्यच आहे.

दस्तुरी येथील उभारलेल्या गेट मधील रस्त्याला जे ब्लॉक लावण्यात आले आहेत त्यात काही टिकाऊपणा नसून ओबडधोबड पद्धतीने लावण्यात आले आहेत. अनावश्यक ठिकाणी लाईट पोल बसविण्यात आले असून अत्यावश्यक भागात नागरिक अंधारात चाचपडत प्रवास करत आहेत. महत्वाचे भागात कचराकुंड्या लावण्याची आवश्यकता आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर मोठया प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तेसुद्धा व्यवस्थित न लावल्यामुळे आणि याचे मुख्य केंद्र कुठं आहे याबाबत सविस्तर माहिती नागरिकांना मिळत नाही.आजपर्यंत केलेल्या कामाचा पुरता बट्ट्याबोळ झालेला असून शासनाच्या पैशाची मोठया प्रमाणात उधळपट्टी करण्यात आली आहे. नगरपरिषदेत एकहाती सत्ता असल्याने आणि त्यातच सभागृहात होणाऱ्या बैठका ह्या स्टँडिंग घेतल्याजात आहेत त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना याबाबतीत काहीच माहिती आकलन होत नाही परस्पर निविदा काढून,तसेच मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाई सुरू असते.

माथेरान हे पर्यटनावर अवलंबून असणारे शहर असतातना पर्यटकांना पर्यावरण पूरक सुवीधा नगरपालिकाच्या माध्यमातून होणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी अनावश्यक कंपाऊंड भिंती उभारून निधीचा गैरवापर वापर झाला या गोष्टीचा फायदा नागरिकांना होत नाही तसेच सी सी टीव्ही बसविण्यात आले ते अतिशय नियोजन शून्य काम आहे त्या मधून काही ही साध्य होताना दिसत नाही.लाईट च्या कामात करोडो रुपये खर्च करून नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे. शासनाच्या निधीचा वापर हा निकृष्ट कामे करण्यासाठी होत आहे.

शिवाजी शिंदे –विरोधी पक्षनेते माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.