Press "Enter" to skip to content

पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना होणार

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔷🔶🔷

पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना करण्यात येणार असून यासाठी इच्छुक व्यक्ती तसेच संस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व विकसन संचालक भरतकुमार व्हावळ यांनी केले आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिंपीक करिता शिफारस केलेल्या सहा निवडक क्रीडा प्रकारात बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराचा दुसरा क्रमांक लागतो. आशियाई कॉमनवेल्थ विजेते, ऑलिंपीक्स् पदके भारतास मिळवून देणा-या क्रीडा क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राचेही भर भक्कम योगदान व स्थान आहे. देशातील बॉक्सिंग मधील प्रथम ध्यानचंद जीवनगौरव व अर्जुन पुरस्कारासहीत बॉक्सिगच्या पहिल्या पद्मश्री पुरस्काराबरोबरच सन १९५० सालच्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसह नियमितपणे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन ही महाराष्ट्रातच करण्यात आले होते.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा, प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग गेली ९५ वर्षे नियमितपणे आयोजित करून चांगले खेळाडू घडविण्या व्यतिरिक्त ऑलिंपीक,आशियाई व कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतातून पाठविण्यात आलेल्या भारतीय पंचाधिका-यातील सर्वात जास्त पंचाधिकारी महाराष्ट्रातूनच घडले. हे या राज्य संघटनेच्या वस्तुत्व व कर्तव्यपूर्ण कार्याचे द्योतक आहे.

बॉक्सिंग या ऑलिंपीक क्रीडा प्रकाराचा प्रसार व प्रचार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेण्याचा राज्य संघटनेचा निर्धार आहे. या धोरणामुळे पनवेल शहर येथील अनेक लोकांचे व संस्थांचे अर्ज राज्य संघटनेकडे आले आहेत. परंतु राज्य संघटना सर्वसमावेशक अशा पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना करू इच्छित आहे. त्यामुळे या खेळाच्या पनवेल शहर येथील जडणघडणीशी इच्छूक लोकांकडून व समूहाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

येत्या नजीकच्या काळात राज्य संघटनेची समिती पनवेल शहराला भेट देणार आहे. त्यावेळी सर्व इच्छूकांना बरोबर घेऊन जिल्हा, शहर संघटना स्थापना तसेच शहर, जिल्हा संघटनेचा कार्यविस्तार या सखोल चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार असून शहर संघटनेत रितसर सहभाग करून घेण्यासाठी पनवेल शहर क्षेत्रातील इच्छुक व्यक्ती, व्यक्ती समूह तसेच संस्थांनी राज्य संघटनेच्या मुंबईतील कार्यालयात त्वरित लेखी अर्ज करावे किंवा अद्वैत शेंबवणेकर ९८७०४०७८०४, ७०४५२२२३२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.