कोकणात जलकुंड निर्मिती आंबा फळबागेसाठी ठरेल जीवनदायी : कृषी सहसंचालक पाटील 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔷🔶🔷
डोंगर-उतारावरील आंबा आणि काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी कोकणात जलकुंड तंत्रज्ञान कृषी विभागाच्यावतीने गोळेगणी तालुका पोलादपूर येथे नामदेव दगडु येरुणकर व सागर गोपाळ मोरे यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना फळबागेची कोकण विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी पाहणी केली. यावेळी सहसंचालक पाटील यांनी मार्गदर्शनदेखील केले.
पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत फळबाग लागवड पाहणी व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने उभारलेले जलकुंड पाहणी करतेवेळी शिवार फेरी दरम्यान तालुका कृषी अधिकारी पोलादपूर कैलास धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील, निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक विजय निकम, सरपंच नितिन मोरे, माजी सरपंच प्रभाकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष अंकूश मोरे, सुरेश मोरे, नामदेव येरूणकर, शेखर येरूणकर, शरद मोरे, तुकाराम मोरे आदी शेतकरी, कृषी सहाय्यक मनोज जाधव, दत्तात्रय नरूटे, अनिल डासाळकर, विकास काकड, संतोष जाधव, संतोष मिसाळ आदी कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी, कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. या फळबागांना उन्हाळयात पाणी व्यवस्थापन करणे अवघड जाते. कोरडवाहू फळपिकांना प्रारंभिक तीन वर्षांच्या काळात सिंचनाची गरज असते, त्यामुळे फळबागांच्या सिंचनासाठी आता अस्तरिकरण शेततळयाचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. परंतु शेततळे आकारमान पाहता कोकणातील बहुतांश ठिकाणी शेततळे करणे शक्य नाही. अशा ठिकाणी जलकुंड निर्मिती केल्यास फळबागेसाठी जीवनदायी ठरेल तसेच खत व्यवस्थापन व कलमे छाटणी व्यवस्थित वेळेवर केली तर डोंगर दुर्गम भागात फळबाग उभारणीसाठी मदत होईल, असे मार्गदर्शनपर विचार मांडले.
कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले असून तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी सहकार्य केले.
जलकुंडाची निर्मिती आणि उपयुक्तता
गोळेगणीतील नामदेव येरूणकर यांनी घरातील व्यक्ती व मजूर साह्याने 5 मी. रूंद, 4 मीटर लांबी आणि 2 मी. खोल अशा आकारमानाचे खोदकाम केले. या जलकुंडासाठी प्लॅस्टिक 500 मायक्रॉन कागदाचे अस्तरीकरण केलेले असून अशा खड्डयांमध्ये निव्वळ पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर पावसाळयानंतर फळपिकांना पाणी देण्यासाठी करण्यात येणार आहे.
नवीन आंबा किंवा काजू लागवडीसाठी डोंगरउताराची व खडकाळ असल्यास 5 मी. रूंद, 4 मी. लांबी आणि 2 मी. खोल मापाचा खड्डा खोदला आहे. अशा खड्डयांना व्यवस्थित चौकोनी आकार द्यावा. जांभ्या जमिनीच्या खड्डयातील बारीक दगडांची अणकुचीदार टोके काढून टाकावीत आणि खड्डयाचा तळ व चारही भिंतींवर अस्तराच्या स्वरूपात बारिक माती सुमारे 10 सें.मी. जाडीचा थर पसरावा. माती पसरून त्यावर कीटकनाशक पावडर क्लोरोडस्ट खड्डयात पसरून द्यावी. त्यानंतर खड्डयाच्या आकारमानानुसार 550 जीएसएम जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करताना प्लॅस्टिक व्यवस्थित पसरून घेतले जेणे करून त्यास घडया पडणार नाहीत.
खड्डयाच्या काठापासून 20सें.मी. अंतरावर 30सें.मी. बाय 30 सें.मी. आकाराचा सभोवताली चर खोदून त्यात प्लॅस्टिकची खड्डयाबाहेरील वाढीव बाजू गाडून मातीने व्यवस्थित झाकून, माती पायाने व्यवस्थित घट्ट दाबावी व खड्डयाच्या सभोवताली मातीचा उंचवटा तयार करावा, यामुळे खड्डयाच्या आजूबाजूने वाहणारे पावसाचे मातीमिश्रित गढूळ पाणी खड्डयात न येता खड्डा पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरून राहील.
खड्डयामध्ये साठविलेले पाणी पावसाळयानंतर उर्वरित काळासाठी (डिसेंबर ते मे) आंबा किंवा काजू कलमांना प्रति आठवडयास प्रति झाडास दहा लिटर या प्रमाणात पुरेसे होते. प्लॅस्टिक अस्तरीत खड्डयातील पाण्याचा बाष्पीभवनाद्वारा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी बांबूच्या पट्टया आणि गवत वापरून तयार केलेल्या सलद्याने खड्डा झाकून ठेवावा, यामुळे मोकाट जनावरे किंवा वन्य प्राणीदेखील तळयातील पाणी पिणार नाहीत, अशी माहिती जलकुंडनिर्मिती करणारे गोळेगणीतील नामदेव येरूणकर यांनी यावेळी सांगितले.








Be First to Comment