झाल्या नुकसानाने खचून न जाता नव्या उमेदीने रंगदेवतेच्या सेवेसाठी सज्ज व्हा : सभागृह नेते परेश ठाकूर
https://youtu.be/-J5DCSPZ258
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶
दिनांक 5 नोव्हेंबर रोजी पनवेल च्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या नाट्यगृह सुरू करण्याच्या निर्णयाने उपस्थित रंगकर्मींच्या मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा प म पा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी,नगरसेविका रुचिता गुरुनाथ लोंढे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कल्याणी सदावर्ते हिच्या बहारदार गणेश वंदना सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या सह रंगकर्मी, कलाकार, पत्रकार आदींनी रंगकर्मींची आद्य देवता नटराज पूजन केले.
यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर लिमये,सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटील, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक मंदार दोंदे, गणेश कोळी,सुप्रसिद्ध गायक, वाद्यवृंद आयोजक मुकेश उपाध्ये, खुमासदार शैलीचे निवेदक प्रविण मोहोकर,रवी जाधव,रवी नाईक आदींनी नटराज पूजन केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पनवेल मंडल प्रमुख कार्यवाह तथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शामनाथ पुंडे यांनी प्रास्ताविक सादर करताना मराठी रंगभूमी दिनाची पार्श्वभूमी विषद केली तसेच संस्थेच्या अन्य कार्यक्रमाचे बाबत उपस्थितांना अवगत केले.
अध्यक्षीय मनोगत सादर करताना परेश ठाकूर यांनी झाल्या नुकसानाने खचून न जाता नव्या उमेदीने रंगदेवतेच्या सेवेसाठी सज्ज व्हा असे तमाम रंगकर्मींना आवाहन केले.तसेच संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या अटल राज्य नाट्य करंडक नव्या ढंगात रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून देईल असा विश्वास त्यांनी रंगकर्मींना दिला. कोरोना टाळेबंदी ने सगळ्यांनाच निराश केले आहे त्यामुळे आता मरगळ झटकून रसिक प्रेक्षकांच्या सेवेत कलाकृती सादर करण्यासाठी सगळ्यांनाच परिश्रम घ्यावे लागतील, परंतु या कामी आमची संस्था सर्वतोपरी रंगकर्मींच्या पाठीशी खंबीर उभी असेल असेदेखील ते म्हणाले.
मान्यवरांच्या मनोगता नंतर सी के टी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भन्नाट विनोदी नाटिका सादर केली. निखिल गोरे यांनी सादर केलेल्या एक पात्री प्रयोगाने सर्व उपस्थितांना अंतर्मुख केले. मुग्धा दातार हिने रंगकर्मींना समर्पित केलेले स्वरचित काव्य सादर केले आणि उपस्थितांची दाद मिळवली.रवी जाधव यांच्या सूरमयी गिताने साऱ्यांना मंत्रमुग्ध केले.
सुप्रसिद्ध कवयित्री स्मिता गांधी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.







Be First to Comment