कोरोनाला हलके घेवू नका -(थेट कोविड सेंटर मधुन)
भारतातील कोरोनाचा वेग अॉक्टोंबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत मंदावला, रुग्ण संख्या घटु लागली आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत जवळपास सर्व काही सुरु झाल आहे. या वातावरणात अनेकजण मात्र जणुकाही कोरोना संपला या अविर्भावात वागत आहेत. तोंडाला मास्क नाही, सॅनीटायजरचा वापर नाही आणि सोशल डिस्टेंसिंग तर नाहीच नाही. दूसरीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकांना कोरोनाच कसलच गांभीर्य नाही. कोरोना सारखा आजार झाल्यानंतर स्वतः सोबत कुटुंबाची काय दुरावस्था होते हे जे यातुन गेले आहेत त्यांना विचारा, नव्हे मलाच विचारा. कोरोनामुळे मी माझ्या वडिलांना कायमचा गमावून बसलो एवढच नाही तर स्वतः पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकलो नाही याहुन मोठे काय दु:ख असेल?
तो दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. ९ अॉक्टोंबरला संध्याकाळी गावाकडून डॉक्टर असलेल्या चुलत भावाचा फोन आला. त्याने वडिलांना श्वास घेण्यात अडचण येत असुन तात्काळ अॉक्सिजनची गरज असल्याच सांगितल. मी तात्काळ गावाकडे धाव घेतली आणि वडिलांना स्वाराती मध्ये घेवून आलो. त्यांचा एक्सरे काढला असता न्युमोनिया असल्याच कळाले. त्यांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली होती मात्र आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्रलंबित असल्याने कोरोना संशयितांच्या वार्डात अॉक्सिजनवर ठेवण्यात आल होत. त्यांच्या सोबत ती रात्र मी त्याच वार्डात काढली. त्यांचा आरटीपीसीआर अहवाल दुस-या दिवशी पॉझिटिव्ह येणार याची खात्री असली तरी मी त्यांना एकटं सोडु शकत नव्हतो. दुस-या दिवशी त्यांची अवस्था गंभीर असल्याचे मला जाणवल्याने मी त्यांना अहमदनगरला खाजगी दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला.
अॅम्ब्युलन्सने तिथे दाखल केल्यानंतर परतीच्या वाटेवर असताना मला त्यांचा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्याच कळाले पण वडिल याने घाबरतील म्हणून याची माहिती मी त्यांना दिली नाही. दूस-या दिवशी डॉक्टरांनी मला त्यांचे दोन्ही फुफ्फुस खूप संक्रमीत झाले असुन त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवल्याचे फोनवर सांगितले. जवळपास १४ दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. या १४ दिवसात मी वडिलांना तिथेच असल्याचे भासवत राहिलो, मागतील ते कोणत्या न कोणत्या माध्यमातून पुरवित राहिलो. दूसरीकडे त्यांच्यासोबत कुटुंबातील तब्बल सात जण पॉझिटिव्ह निघाले होते त्यात माझ्या आईचाही समावेश होता. परिस्थिती त्यामुळे आणखीनच गंभीर झाली असताना माझी जबाबदारी मात्र वाढली होती. ईतर सात जणांवर धारुरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते.
१४ व्या दिवशी मात्र वडिल अहमदनगरला राहण्यास तयार नसल्याने त्यांना गावाकडे घेवून चाललो असं खोट सांगुन परत एकदा अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केलं. त्या दिवसापासून वडिल माझ्यावर नाराज होते, ते नंतर एकदाही मला फोनवर बोलले नाहीत. पूढे जवळपास ८ दिवस त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार सुरु होते. जड अंतकरणाने मी रोज आयसीयुकडे जायचो. त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारपूस करायचो. त्यांना खूप बघाव वाटायच पण ती हिम्मत माझ्यात कधीच आली नाही. त्यांचं मनोबल वाढावे म्हणून जेंव्हा – जेंव्हा शक्य होईल तेंव्हा भाच्याला पीपीई किट घालून त्यांच्या जवळ बसवलं मात्र नियतीच्या मनात काही वेगळच होत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावतच गेली.
एव्हाना मलाही हलका ताप येवू लागला होता. थोडा खोकलाही येत होता. २९ अॉक्टोंबरला माझी आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्याने नाईलाजास्तव मला उपचारासाठी धारुरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हाव लागलं. मी कुटुंबातील १० वा कोरोनाबाधित होतो. माझ संपूर्ण लक्ष मात्र वडिलांकडे लागल होत. ३० अॉक्टोंबरला राञी ११ वाजता मला माझ्या वडिलांच निधन झाल्याच फोनद्वारे कळवण्यात आल. त्यांची २० दिवसांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली होती. ती रात्र मी एकट्याने जागुन काढली. अश्रु अनावर झाले होते मात्र ते कोविड सेंटर असल्याने मनसोक्तपणे रडुही शकत नव्हतो. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांचे अंत्यदर्शनही घेवु शकलो नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल?
आज ८ दिवस झाले कोविड सेंटर मध्ये उपचार घेतोय. यादरम्यान येथील डॉक्टरांनी खूप मानसिक आधार दिला. आता घराची ओढ लागली आहे. घरी जाऊन मनसोक्तपणे रडायचय, भावनांना वाट मोकळी करून द्यायची आहे. म्हणून म्हणतो, कोरोनाला हलके नका घेऊ. माझ्यासारखं बिकट अवस्थेला आपल्याला सामोरे जावू लागु नये म्हणून काळजी घ्या, नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा.
- सुरेश मंत्री.
संपर्क – ९४०३६५०७२२
Be First to Comment