कडसुरे पाणीपुरवठा योजनेचे साडेपाच लाख रुपये सचिवांच्या खोट्या सह्या करून काढल्याचा आरोप

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठणे विभागातील कडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेच्या बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेत असलेल्या संयुक्त खात्यातील सुमारे साडेपाच लाख रुपये फेब्रुवारी, २०२० मध्ये या योजनेचे अध्यक्ष व विद्यमान सरपंच राजेंद्र शिंदे यांनी धनादेशावर योजनेच्या सचिव सुजाता शिंदे यांच्या राजिनाम्या नंतरही त्यांच्या हुबेहुब खोट्या सह्या करुन स्वतःच्या नावे रक्कम काढल्याचा आरोप कडसुरेतील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या योजनेच्या रकमेचा अपहार झाला असून राजेंद्र शिंदे यांचे सरपंचपद रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कडसुरेचे एक जागरूक नागरिक महेश शिंदे व अन्य ग्रामस्थांकडून रोहा पंचायत समितीच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यांकडे निवेदनांद्वारे करण्यात आली आहे.
याप्रकरणी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठणे विभागातील कडसुरे (ता.रोहा) गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०११-१२ मध्ये सुमारे ४६ लाख २८ हजार, ९२८ रुपये मंजूर झाल्यानंतर या योजनेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र शिंदे व सचिव म्हणून सौ. सुजाता अनिल शिंदे यांच्या नावे बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेत संयुक्त खाते उघडण्यात आले होते. ही योजना कडसुरे ग्रामपंचायतीकडे २०१८ मध्ये हस्तांतरितही करण्यात आली. नंतर ग्रामस्थांनी या योजनेच्या चौकशी करिता तक्रारी अर्ज दिलेला असतांनाच व याची कल्पना या योजनेचे अध्यक्ष व विद्यमान सरपंच राजेंद्र शिंदे यांना असतांनाही त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेतून ११ फेब्रुवारी, २०२० रोजी ३ लाख ५० हजार रुपये व नंतर लगेच १३ फेब्रुवारी, २०२० रोजी २ लाख रुपये असे एकूण ५ लाख ५० हजार रुपये स्वताच्या नावे बेरर धनादेशाने काढल्याचे बँकेच्या तपसिलावरून दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे सुजाता शिंदे यांनी २६ डिसेंबर, २०१९ रोजी सचिव पदाचा राजीनामा संबधित कार्यालयाकडे सादर केलेला आहे. असे असतांनाही त्यानंतर फेब्रुवारी, २०२० मध्ये राजेंद्र शिंदे यांनी दोन वेळा आपल्या खोट्या सह्या वापरून ही रक्कम काढल्याचा आरोप करीत सुजाता शिंदे यांनीही या नियमबाह्य गैर व्यवहाराबद्दल राजेंद्र शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या योजनेची रक्कम योजनेतील नमूद अटी व शर्ती पूर्ण झाल्यानंतर योजनेचे उपअभियंता व गटविकास अधिकारी यांच्या मंजुरीने निधी खर्च करण्याचे राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतांनाही राजेंद्र शिंदे यांनी ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याच्या दोन वर्षानंतर बेरर धनादेशाने साडेपाच लाख एवढी मोठी रक्कम परस्पर स्वताच्या नावे काढली असल्याचे बँकेच्या तपशिलावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात योजनेचे अध्यक्ष व कडसुरेचे विद्यमान सरपंच राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, सुजाता शिंदे यांनी कधी राजिनामा दिला त्याची मला कल्पना नसून धनादेशावरील सह्याही खोट्या नसून त्यांच्याच ख-या सह्या आहेत. त्यामुळे कुणाला या सह्या खोट्या वाटत असतील तर या सह्यांची फाॅरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करुन त्याची सत्यता तपासण्यात यावी.
तर योजनेच्या सचिव सुजाता शिंदे यांनी सांगितले की, २६ डिसेंबर, २०१९ रोजीच मी या योजनेच्या सचिव पदाचा राजीनामा दिला असल्याने फेब्रुवारी, २०२० मध्ये काढण्यात आलेल्या रकमेच्या धनादेशावर मी सही करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे माझी खोटी सही करून केलेल्या या गैरव्यवहाराप्रकरणी राजेंद्र शिंदेंवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.






Be First to Comment