सिटी बेल लाइव्ह /उरण(घन:श्याम कडू)
देशात व राज्यात कोरोना कोविड १९ ने हाहाःकार माजवला आहे. कोरोनाची दहशत एवढी निर्माण झाली आहे की कोणाला ताप, सर्दी, खोकला होऊनही ते कोरोनाच्या भीतीने डॉक्टरांकडे जाणे टाळत आहेत. उरणमध्ये दररोज अनेकजण कोरोना पॉजेटीव्ह म्हणून सापडत आहेत. पॉजेटीव्हचा आकडा वाढत असून त्यामध्ये सर्वसामान्यांसहीत राजकीय, प्रतिष्ठित मंडळीही सापडत आहेत. परंतु ही राजकीय मंडळी कोरोना झाला नसल्याचे सांगत आहेत. मग हे आठ दहा दिवस दवाखान्यात उपचार का घेत असतात असा सवाल यानिमित्ताने उभा रहात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उरणमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोनाची भीती एवढी निर्माण झाली की हा आजार झाल्यानंतर कोणी जवळ तर न येता दवाखान्यातही एकट्यालाच रहावे लागत असल्याने जनतेत भितीचे वातावरण पसरले आहे. या आजारात बळी ही जाण्याची शक्यता असल्याने अनेकजण हा आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आजार वाढल्यावर पेशंटची टेस्ट केली जाते. यातील बहुतांश टेस्ट या कोरोना पॉजेटीव्ह येत असल्याने अधिक भीती निर्माण होत आहे. जरी कोरोना झाला तरी योग्य उपचार केले तर नक्कीच पेशंट बरा होतो. उरणमध्ये आज अनेक कोरोना पॉजेटीव्ह सापडले आहेत. त्यामध्ये लहान थोरांपासून मग ते सामाजिक, राजकीय अथवा प्रतिष्ठित या सर्वांना याची लागण होत आहे. काही जण लगेच तपासणी करून कोरोना असल्यास उपचार घेऊन बरे झाले आहेत. ज्यांच्या शरीरात पसरला आहे त्यातील काहींचा बळी गेला आहे. अशा प्रकारे कोरोना आजाराची दहशत निर्माण झाली आहे. कोरोना हा कोणालाही होऊ शकतो. प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी व कोरोना झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांना लवकर होत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांच्या दररोज रिपोर्ट प्रसिद्ध होत आहे. मात्र त्यात नांवे प्रसिद्ध होत नसल्याने भागाची माहिती होते पण लागण कोणाला झाली हे माहिती होत नाही. नेमकी याचाच फायदा उठवत अनेकजण कोरोना बाधीत होऊनही दवाखान्यात उपचार घेत असतात. मात्र इतरांना ते कोरोना नसल्याचे सांगत काही दिवसांत घरी येऊ असे सांगतात. काहीजण तर घाबरून उरण सोडून ते इतर ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोना लपाछपीमध्ये सामाजिक, राजकीय प्रतिष्ठीतांबरोबर सर्वसामान्य मंडळींचा समावेश आहे. आता तर दवाखान्यात बेडही शिल्लक नसल्याचे समजते. म्हणून कोरोना आजाराची लपाछपी करून त्याचा प्रादुर्भाव वाढत बळींचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. तरी अशा आजाराला खतपाणी घालणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी वर्गावरही कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.






Be First to Comment