Press "Enter" to skip to content

अशोक जंगले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

अशोक जंगले : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या क्षितिजावरचा तारा निखळला…

सिटी बेल लाइव्ह । खोपोली । 🔷🔶🔷

आज 2 नोव्हेंबर रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेन्टर उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना दुपारी एक वाजता कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.नवीन आयसीयू रूम मध्ये दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना नवी मुंबईत डी वाय पाटील रुग्णालयात हकविनायत आले.तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.अशोक जंगले हे कर्जत मधील नामवंत दिशा केंद्राचे कार्यकारी प्रमुख होते.

💠🌟💠🌟💠🌟💠🌟💠🌟

मला रात्री अपरात्री आणि कधीही अशोकजींचा फोन आला की, खात्री असायची की हा माणूस तातडीच्या कामाशिवाय फोन नाही करणार.

मी पण त्याच पद्धतीने त्यांच्याशी संपर्क ठेवायचो. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हा माणूस नेहमी तत्पर असायचा. अनाथ मुलांसाठी चाईल्ड लाईन वर कोणते काम असेल, बेवारस व्यक्तीला मदत करणे असेल, आदिवासींची समस्या असेल किंवा कोणतीही सरकारी किंवा प्रशासकीय माहिती हवी असल्यास बेदिक्कतपणे अशोकजींना संपर्क केला आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही असे कधी झालेच नाही.

ते उत्तम स्तंभ लेखक होते. आदिवासी/वंचित/दुर्बल घटकांसाठी हा माणूस पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरायचा. अनेकांच्या संसाराला त्यांनी सावरले होते. प्रशासकीय यंत्रणेला नेहमी त्यांचे सहकार्य असायचे. आदिवासी क्षेत्रात पोटतिडकीने काम करणारे कि-फॅक्टर असलेले अशोकजीना त्या क्षेत्राचा इंसायक्लोपीडिया म्हणायला हरकत नव्हती किंबहुना ते प्रचंड माहितगार होते.

समाजिक क्षेत्रात असे अनुभवी आणि अभ्यासू मार्गदर्शक मिळणं दुर्मिळ झालेले असताना, असं बाप व्यक्तीमत्व हिरावून नेणाऱ्या ईश्वराला मी नक्किच दूषणं देईन. ईश्वरीय शक्ती जेथे उणी पडायची तेथे अशोकजी अधिक प्रखरपणे कार्यरत व्हायचे.

आज त्यांचे छोटेसे कुटुंब आणि दिशा केंद्र परिवार नैतिक पातळीवर उध्वस्त झालाय. हजारो कुटुंबाना आधार देणारा वटवृक्ष आज उन्मळून पडला आहे.

आज रुग्णालयाच्या अपग्रेडेशनच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. बाळंतपणात महिलांना अतिरक्तस्राव झाल्यास कर्जत मध्ये ब्लड रिझर बँक उपलब्ध होण्यासाठी काहीतरी करा अशी विनंती वजा आग्रह त्यांनी प्रांत वैशाली परदेशी मॅडम कडे धरला होता. लॉक डाऊन मध्ये प्रत्येक आदिवासी वाड्या आणि पाड्यावर मदत पोचवणारा खरा मदतनीस होता असं प्रांत मॅडम भरल्या आवाजात मला सांगत होत्या.

अशोकजी तुम्ही नसाल मात्र तुमची प्रेरणा आणि तडफ आमच्या सोबत असेल.

आम्ही चालवू पुढे तुमचा वारसा … असा शब्द देतो आणि तीच खरी तुमच्यासाठी श्रद्धांजली असेल.

@ गुरुनाथ रामचंद्र साटेलकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.