सिटी बेल लाइव्ह । प्रमाेद जाधव । माणगांव । 🔷🔶🔷
पहिली माणगांव ग्रामपंचायत निवडणूक दादा भादाव येथून निवडून आले ते दिग्गज व्यक्तीचा पराभव करुन… त्यावेळी त्यांचे वय होते… फक्त २० वर्ष….साल होते… १९६५ ते १९७० त्यावेळी विरोधी पुढार्यांनी चोहोबाजूंनी फिल्डींग लावलेली होती. गावात सभा घेणे अशक्य होते. तेव्हा गनिमी काव्याने वाकडाई मंदिर येथून काळ नदी पोहत रात्री २.०० वा. भादाव गावात गावकीची मतदानाच्या आदल्याच दिवशी बैठक घेतली आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.आता मतदानाचे वय १८ आहे. त्यावेळी सरकारी कर्मचारी यांनी वय कागदोपत्री वाढविले होते.
दादासाहेब यांचे कर्मचार्यावर किती प्रेम असावे. याचा विचार करावा. आज एक जरी कागद किंवा आडनावात शब्द चुकला असेल उमेदवारी अर्ज बाद होतो. लोकांनीच त्या तरुण वयात निवडणूक लढवावी असा मोठा आग्रह धरला होता. येथूनच राजकारणात दादांनी प्रथम पाऊल टाकून ते पुढे ग्रामपंचायत सदस्य… कामाच्या जोरावर उपसरपंच ते माणगावचे सरपंच झाले.
त्यानंतर ते पंचायत समिती निवडणूक लढले ते मोरबा मतदार संघातून…. तेव्हा त सहज निवडून आले. तेव्हा मुस्लिम, कुणबी,दलित, आदिवासी आदी सर्व धर्माच्या जनतेने निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या समाजातील एकही मत नव्हते. हे अलौकिक होते. असे संपूर्ण महाराष्ट्रात कधीही घडले नसेल. पैसा नाही, गाडी नाही…. दादासाहेब यांच्याकडे होती फक्त मानवता आणि मजबुत विश्वासू कार्यकर्त्यांची फळी…. निवडून आल्यावर उपसभापती… आणि लगेचच सभापती झाले… आणि संपूर्ण तालुक्यात एकच जय घोष…. अशोकशेट साबळे यांचा विजय असो…..कार्यकर्त्याचा मान सन्मान राखणारे रायगड जिल्ह्यातील एकमेव व्यक्तीमत्व …आपले दादा होत.
विशेष म्हणजे तेव्हा दादांनी विजयराज खुळे यांना शिवसेनेतून निवडून आणून महाराष्ट्रात ते पहिले जिल्हा परीषद सदस्य झाले होते. दादांनी हा माणगावात इतिहास घडविला होता. आजही खुळे हे दादांना राजकीय गुरू मानतात.
सभापती असताना दादासाहेब यांच्या वर दोनदा अविश्वास ठराव विरोधकांनी आणला होता. हा ठराव मंत्री अंतुले साहेब आणि तत्कालीन बिनविरोध आमदार राम महाळुंगे यांनी आणला होता. परंतु पुरेसा संख्याबळ नसतानाही तमाम कार्यकत्यांच्या हिमतीवर… ताकदीवर… त्यांच्या वर जिवापाड प्रेम करणाऱ्या जनतेच्या रेट्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर झाला. इतके प्रेम कार्यकर्त्यांनी दिले होते.
मात्र सभापती असताना त्यांच्या दुचाकीचा ( गाडीचे नाव यजडी ) अपघात झाला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. सभापती असताना पाणी, रस्ते, शाळा, वीज या कामांना प्राथमिकता देऊन माणगाव तालुक्याच्या विकासाचा पाया रचला. या सर्व कामांवर ते जातीने प्रत्यक्ष जाऊन लक्ष देत असत. साल होते… १९७० ते १९८०….
त्यानंतर दादांच्या राजकीय राजकारणाला कार्यकर्त्यांनी कलाटणी मिळवून दिली. आपण आता आमदारकीला उभे रहावे असा जोरदार आग्रह लोकांनी धरला. दादा शेवटपर्यंत नाहीच म्हणत होते. पैसा… गाडी असे काहीच नव्हते. मात्र त्यांची खरी संपत्ती हि कार्यकर्ते आणि जनता…. अशोकशेट पैशाची काळजी करु नका… तुम्ही फक्त निवडणूक लढवा.साल होते….१९८०
दादा जनता पक्षाचे उमेदवार होते. तर कॉंग्रेस पक्षाकडून तळे येथील धनाड्य उदयोगपती लोखंडे होते. दादांकडे प्रचारासाठी दिपकभाईंचा एक ट्रक, संजय आण्णांचा निळया रंगाचा टेम्पो… दोन ते तीन दुचाकी…. ट्रक मध्ये आम्ही बारीक सारीक तरुण कार्यकर्ते… सोबत वडापाव शिवाय काहीही नाही. टेम्पो मधून मधल्या फळीतील जूने जाणते कार्यकर्ते अगदी अक्षरशः कोंबून भरलेले असत.त्यांचे नेतृत्व भाई आणि आण्णा करीत असत…मी… आणि राजीवजी ट्रक मधून जोरजोरात घोषणा देत होतो..
त्यावेळी खेड्यातील गावकरी पहाटे ४-५ वाजेपर्यंत दादासाहेब यांची वाट पहात असत. रात्रीचे आम्ही चुन्यानी गावोगावी भिंती रंगवून दादांच्या प्रचाराला हातभार लावत होतो.आजही चणेरे येथील जुन्या घराच्या भिंतीवर प्रचाराच्या खूणा दिसतात. दादांच्या प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्ते अक्षरशः पेटून उठले होते. सर्वच जण तहान भूक विसरून प्रचार करीत होते. दादासाहेब यांची निशाणी होती…. छत्री… लोखंडे साहेबांची निशाणी हाताचा पंजा.. त्यावेळी लोखंडे यांच्या प्रचारासाठी अंतुले साहेबांनी १३ प्रचार सभा घेतल्या तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माणगांव येथे कचेरी रोडवरील गणेश कॉंम्प्लेक्स मोठ्या मैदानावर जोरदार सभा झाली. तेव्हा पंतप्रधानांच्या डोक्यावर अंगरक्षकांनी छत्रीच धरली होती हे विशेष होय…
मतदान झाले आणि ममतमोजणी सुरु झाली. प्रत्येक मतमोजणी नंतर लोखंडे हे आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके आणि गुलाल आणून आनंदोत्सव साजरा करीत होते. आम्ही कार्यकर्ते हिरमुसले होतो. परंतु दादांना कमालीचा आत्मविश्वास होता. शेवटी शेवटच्या गांगवली,मोरबा, खरवली व लोणशी विभातील मतपेटीतून इतके भरभरून मतदान मिळाले की दादासाहेब ४ मतांनी निवडून आले. मग काय… माणगांव व गल्ली बोळातून एकच आवाज आसमंतात दुमदुमत होता…. अशोकशेट साबळे यांचा…… विजय असो… अशोकशेट साबळे झिंदाबाद….. आजही त्या दादासाहेब यांच्या विजयाने डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याशिवाय रहात नाही. हा विजय केवळ कार्यकर्ते आणि जनतेचा होता असे दादा सर्वांना सांगत असत…
आपल्या विजयाचे श्रेय सामान्य जनतेला देणारे…. दा दा ….कायमस्वरूपी माणगांव आणि रोहेकरांच्या स्मरणात आणि ह्रदयात राहतील. असा नेता कधीही होऊ शकणार नाही. कार्यकर्ते व जनतेच्या वर्गणी ( २६,००० ₹ ) निवडून येणारे दादा साहेब महाराष्ट्रात एकमेवाद्वितीय असतील….
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपुर्ण श्रध्दांजली आणि आदरांजली …..
Be First to Comment