परळीतील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह
संपर्कातील 2 डॉक्टरसह 20 जण कॉरेंटाईन
सिटी बेल लाइव्ह / पाली / बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यात परळी येथील एका 34 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल शनिवारी (दि.4) पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कातील 2 डॉक्टरसह 20 जणांना कॉरेंटाईन करण्यात आले आहे. तर रुग्णावर वावळोली येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून परळी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.
तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आता 6 झाली आहे. मात्र पालीतील आणखी एक तरुण कोरोनाबाधित आहे. मात्र त्याने खोपोली येथील पत्ता दिल्याने त्याची नोंदणी खालापूर तालुक्यात झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले. सध्या या रुग्णांवर देखील वावळोली येथील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू असून त्याच्या कुटुंबियांसह संपर्कातील लोकांना कॉरेंटाईन करण्यात आले असल्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.
प्रशासन कोरोनाच्या संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तालुक्यातील जनतेला केले. तर सुधागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले की नागरिकांनी सावधान राहावे, घाबरून जाऊ नये पण नियम पाळून काळजी घेणे गरजेचे आहे.
सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला होता. (दि.24) नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर 2 जून ला गोमाशी येथील एका 24 वर्षीय तरुण व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मागील महिन्यात हे दोन्ही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी पालीत 3 कोरोना रुग्ण सापडले. आणि शनिवारी (दि.4) परळी आणखी 1 रुग्ण आढळल्याने तालुक्यासह पालीत नागरिकांमध्ये घबराट पसरली असून विविध प्रकारच्या अफवांना उधाण आले आहे. अशातच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Be First to Comment