जागर नवदुर्गेचा
माळ नववी
‘सिद्धिदात्री’
सिद्धिदात्री देवीचे पूजन करुनिया, पूर्ण होई पुण्यलाभदायी उपासना सर्व देवीरूपांची;
दुर्गेच्या या नवव्या शक्तीरूपाची महती सांगूनि, करिते सांगता नवरात्रातील या जागराची…
सिद्धिदात्री देवी चे हिमाचलच्या नंदापर्वतावर प्रसिद्ध क्षेत्र आहे. ही देवी चार भुजाधारी आहे. उजव्या बाजूच्या खालच्या हातात चक्र व वरच्या हातात गदा तसेच डाव्या बाजूच्या खालच्या हातात शंख व वरच्या हातात कमळ आहे. हिचे वाहन सिंह असून ही देवी कमळावरही विराजमान होते.
अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धिदात्री मध्ये या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवी सारखे झाले होते. या कारणामुळे शंकरास ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने प्रसिद्धी मिळाली.
या देवीची पूजा केल्याने सर्व देवीची उपासना घडते, असे मानले जाते. नवरात्रातील या दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी शास्त्रोक्त विधीपूर्ण निष्ठेने या देवीची पूजा करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.
देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर होऊन मनुष्य सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षमार्गही मिळतो. नवदुर्गांमध्ये देवी सिद्धिदात्री शेवटचे शक्तिरूप आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. *समाप्त*
‘आज शुभमुहूर्तरुप दसरा’
नवरात्रातील नवदुर्गारूपांची जागर समाप्ती होई ज्या दिवशी;
तोच हा दिवस महिषासुरवधाचा, जागृत करी नेतृत्त्वगुण अंगी…
साडेतीन मुहूर्तांपैकी विजयादशमी हा सण म्हणजे दसरा;
दर्शवितो शौर्य-पराक्रम-आनंद-समृद्धीची हिंदू परंपरा…
प्रामुख्याने सरस्वतीपूजनाचे अन् शस्त्रपूजनाचे महत्त्व असे या दिवशी;
स्वागत समृद्धीचे होई, आपट्याची पानेरूपी सोने देऊनि एकमेकांसी…
त्रेतायुगापासून साजरा होणारा हा सामर्थ्यदर्शक महोत्सव, जीवात उत्पन्न करी क्षात्रभावधर्म;
अश्विन शुद्ध दशमीला देवीतत्त्व व विष्णुतत्त्व मिळून करी सृजनतेसह वाईट शक्तींचे विनाशकार्य…
हिंदू संस्कृतीच्या या धार्मिक सणात दडलेल्या योग्यज्ञानपूर्णतेनुसार आपण आजच्या युगात संदेशप्रकल्प;
अमलात आणू या, करुनी काम-क्रोध-मद-मत्सर-मोह-लोभ-स्वार्थ-अन्याय-हिंसा-क्रौर्य हे दुर्गुणनाश करण्याचा संकल्प…
✍️ लेखिका व कवयित्री ✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.
Be First to Comment