सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
रायगड जिल्हा प्रशासनाने गरजेचे असलेले आधार कार्ड काढताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होवू नये म्हणून ठिकठिकाणी केंद्र सुरू केले होते. परंतु, आधार कार्ड केंद्र चालकांकडून चुकीचे कामे केली जात असल्याचे समोर आल्याने अनेक आधार केंद्र बंद करण्यात आली आहेत. यामुळे नवीन पनवेल मधील मु्ख्य पोस्ट कार्यालयातच आधार कार्डचे काम होत अयल्याने नागरिकांची तोबा गर्दी होत आहे.
पहाटे येवून सुद्धा नंबर लागेल की नाही अशा नागरिकांना येरझरा माराव्या लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे तेव्हा कामोठे पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेना कामोठे उपविभाग प्रमुख गणेश खांडगे यांनी खासदार श्रीरंग ( आप्पा) बारणे यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
पनवेल शहर व परिसरातील शहरातील लोकसंख्या पाहून शहरात आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आली होती. त्या केद्रावर चुकीचे काम होत असल्याने त्या केंद्रांना कुलूपं ठोकण्यात आले आहेत.अशा परिस्थितीत पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर आदि शहरासह सात-आठ गावातील नागरिकांची एकमात्र असलेल्या नवीन पनवेल मुख्य पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड केंद्रावर कार्ड काढण्यासाठी तोबा गर्दी होत आहे.
या आधार केद्रावर प्रत्येक दिवशी ७० नंबर घेत असल्याने पहाटे ६ वाजता येवूनही एक दोन वेळा परत जावे लागत आहे. एका वेळा येवून येथे काम होत नाही. एकाचवेळी अनेकजण आधार कार्ड काढण्यासाठी तोबा गर्दी करत असल्याने येथील कर्मचारी हैराण झाले आहेत. तेव्हा प्रशासनाने मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कामोठे पोस्ट ऑफिस मध्ये नवीन आधार केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख गणेश परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गैरसोय दूर करावी
शासकीय कामकाजात आधार कार्ड सरकारने सक्तीचे केले आहे. यामुळे सहाजिकच ज्यांनी आधार कार्ड काढलेले नाही. ते कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर येत असतात. तर काहीजण पत्ता, मोबाईल नंबर, नावात बदल करणे यासाठी फे-या मारत असतात एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या मागे एकच आधार केंद्र सुरू असल्याने नागरिकात तीव्र नाराजी आहे. सुरूवातीला प्रत्येक शहरात आधार कार्ड काढण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, काही कारणांमुळे ती आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तेव्हा लोकसंख्या बघता प्रत्येक शहरात आधार केंद्र सुरू करून नागररिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
चुकीच्या कामामुळे केंद्र बंद
बंद करण्यात आलेल्या आधार केंद्रांवर चुकीचे कामे होत असल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. त्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अव्यवस्था तसेच चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळेच जे केंद्र बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. कुठलाही पुरावा नसताना आधार कार्ड काढले जात असल्याने प्रशासनाने आधार केंद्र बंद करण्याचा निर्णय़ घेतल्याचे समजते.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख विलास कामोठकर, शहर प्रमुख राकेश गोवारी उपस्थित होते.







Be First to Comment