शुक्रवारी शारजाहच्या मैदानात झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईने प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. चेन्नईच्या संघाने विजयासाठी दिलेले 115 धावांचे आव्हान मुंबईने 13 व्या षटकात पूर्ण केले.
मुंबई टॉपवर
चेन्नईचे आव्हान मुंबईने लिलया पार केले आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईने 10 लढतीत 7 विजय मिळवले असून रोहितच्या संघाचे 14 गुण झाले आहे, तसेच नेट रनरेट देखील +1.448 एवढा आहे.
किशन-डीकॉकची दमदार खेळी
चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढत ईशान किशन आणि क्विंटन डीकॉक या डावखुऱ्या सलामीवीर खेळाडूंनी नाबाद 116 धावांची भागीदारी केली.
ईशान किशनने 37चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 68 धावा, तर डीकॉकने 37 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 46 धावा केल्या.
चेन्नईचा डाव कोसळला
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईचा डाव सुरुवातीपासून कोसळला. चेन्नईच्या फलकावर अवघ्या 3 धावा असताना त्यांचे 4 खेळाडू बाद झाले. गायकवाड शून्य, रायडू 2, जगदीशन शून्य आणि डु प्लेसिस 1 धावा काढून बाद झाले.
सॅम कुरमने लाज राखली
यानंतर जडेजा 7 आणि धोनी 16 धावा काढून बाद झाल्यावर चेन्नईची अवस्था 6 बाद 30 अशी होती. मात्र अष्टपैलू सॅम कुर्रमने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत एकहाती किल्ला लढवला.
सॅमने अखेरपर्यंत डाव नेत चेन्नईला 100 धावांचा टप्पा ओलांडुन दिला. शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी सॅमने 52 धावा केल्या. इम्रान ताहीरसोबत त्याने 43 धावांची भागीदारी केली. ताहीर 13 धावांवर नाबाद राहिला.
बोल्टचा चौकार, बुमराहची साथ
चेन्नईला भगदाड पाडण्यास सुरुवात केली ती ट्रेंट बोल्ट याने. पहिल्याच षटकात बोल्टने ऋतुराज गायकवाडला बाद केले. संपूर्ण लढतीत त्याने 4 बळी घेतले.
बोल्टला जसप्रीत बुमराह याने 2 बळी घेत चांगली साथ दिली. बुमराहने रायडू आणि जगदीशन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. बुमराहसह राहुल चहर याने 2 आणि नाथन कुलटर-नाईल याने 1 बळी घेतला.
मुंबई गुणतालिकेत टॉपवर
मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा 10 सामन्यातला सातवा विजय ठरला. त्यामुळे 14 गुणांसह मुंबईचा संघ आता टॉपवर पोहोचला आहे. मुंबईला आता बाद फेरी गाठण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतूनही काही दर्जेदार युवा खेळाडू आपल्या जबरदस्त कामगिरी करत आहेत. हेच युवा भारतीय खेळाडू येत्या काही वर्षात भारताचे प्रतिनिधित्व करतील. आयपीएल स्पर्धेतून भारतालाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अशा नवोदित सक्षम खेळाडूंची ओळख होत असते.
संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल टी -20 स्पर्धेत रवी बिष्णोई, ईशान किशन, राहुल तेवतिया, देवदत्त पड्डीकल, टी. नटराजन, कार्तिक त्यागी या खेळाडूंनी आपल्या खेळातून त्याचबरोबर बड्या-बड्या खेळाडूंसोबत खेळतानाही खेळाचा ताण सहन करण्याच्या क्षमतेचं प्रदर्शन करून क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Be First to Comment