माळ आठवी
‘महागौरी’
अष्टवर्षीया, वृषभारुढा, चतुर्भुजा, शांतीप्रिया श्वेतांबरधरा देवी;
महिमा तुझा वर्णिते हे महागौरी, तू सर्वपापविनाशक सौभाग्यदायिनी…
या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते,’अष्टवर्षा भवेद् गौरी|’ तिचे वस्त्र व आभूषणे देखील श्वेत रंगाची आहेत. म्हणून तिला श्वेतांबरधरा म्हटले जाते. महागौरीला चार भुजा असून वृषभारुढ असलेल्या या देवीच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वरमुद्रा आहे. महागौरी देवीची ही पूर्ण मुद्रा अत्यंत शांत आहे.
आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. गोस्वामी तुलसीदास यांच्यानुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता—
जन्म कोटि लगि रगर हमारी |
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी ||
या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधिले जाते.
देवी महागौरी चे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वपापमुक्ती करणारी व सर्वाधिक कल्याणकारी आहे. भविष्यात पाप, संताप, दुःख भक्तांजवळ कधीही येत नाही व भक्त सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचे अधिकार प्राप्त करतात. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्तांचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. या देवीला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.
✍️ लेखिका✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.
Be First to Comment