Press "Enter" to skip to content

लाॅकडाऊन करून कोरोना नियंत्रणात आला नाही तर जबाबदार कोण ?

मनसे नेते गोवर्धन पोलसानी यांचा पालकमंत्र्यांना सवाल !

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठेतरी कोरोना संसर्ग रोगावर नियंत्रण येण्याच्या दृष्टीने रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १५ जुलैच्या मध्यरात्री पासून दहा दिवस संपूर्ण रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन केलेले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी कदाचित हे योग्यही असेल परंतु लाॅकडाऊन करून करोना वायरस नियंत्रणात आला नाही तर जबाबदार कोण ? असा सवाल मनसे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी प्रसिद्धी पत्रका मार्फत केला आहे.

गोवर्धन पोलसानी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अदिती तटकरे ह्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत याचा आम्हाला समस्त रायगड वासियांना अभिमान आहे. आपण लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्यच असेल परंतु रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्राम पंचायत वारंवार लाॅकडाऊन करीत आहेत व थोडेफार प्रमाणात अपवाद वगळता त्यास जनता उत्तम प्रतिसादही देत आहेत.
सततच्या लाॅकडाऊन मुळे सामान्य जनता, छोटे मोठे व्यापारी, बॅंका कडून कर्ज घेऊन छोटे मोठे उद्योजक. आदिवासी बांधव व रोज हातावर कमावून आपले पोट भरणारे मजुर मेताकूटीस आले असून आत्महत्या करावी की काय ? या मनस्थितीत आलेले आहेत असेही पोलसानी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

गोवर्धन पोलसानी यांनी पुढे म्हटले आहे की, आदितीताई खा. सुनिल तटकरे यांच्या वारसदार आहेत. त्यामुळे त्या उपजतच हुशार आहेत. परंतु ताई सध्याच्या या काळात एखाद्या व्यक्तीस साधा ताप जरी आला तर कोणतेही डॉक्टर त्या व्यक्तीस तपासत देखील नाहीत समजा एखाद्या डॉक्टरने तपासले तर तो दुप्पट पैसे घेतो ही वस्तुस्थिती आहे. गरिबांनी काय करायचे? त्यांना जेवायला अन्न नाही ते डॉक्टरला कुठून पैसे देतील ? रायगड जिल्ह्यामध्ये असलेले मोठे प्रकल्पाचे व्यवस्थापण कोणत्याही प्रकारे आपल्या कामगारांची व कर्मचारी यांची आरोग्य विषयक जबाबदारी व काळजी घेत नाही तसेच माहितीही जाहिर करत नाहीत. कडक संचारबंदी असतानाही. ते कोणतेही नियम व आदेश पाळत नाहीत. हे वारंवार निदर्शनात आले आहे. रायगड जिल्ह्याती प्रकल्पात फार मोठया प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करीत आहेत. व सदर कामगार कुठून आलेत ? त्यांची शासनाकडे नोंद आहे का ? त्याची कोरोना संसर्ग रोगाची चाचणी झाली आहे का ? प्रकल्प व्यवस्थापण कोरोना संसर्ग रोग्याची माहीती का लपवत आहे? यामूळे सामान्य जनतेच्या मनात. तीव्र संताप दिसुन येत आहे. तरी याबाबत शासनाने वरिल सर्व गंभीर बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अशी नम्र विनंतीही मनसे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.