Press "Enter" to skip to content

कोरोना पश्चात उपचारांसाठी नवी मुंबईत पहिलेच ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरु

कोरोना पश्चात उपचारांसाठी नवी मुंबईत पहिलेच ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरु

‘कोरोना’ पासून बऱ्या झालेल्या, परंतु आरोग्यविषयक तक्रारींनी सतत ग्रासलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी विशेष दवाखाने

नवी मुंबई, २० ऑक्टोबर २०२०: नवी मुंबईतील ‘अपोलो हॉस्पिटल’ ने कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या, परंतु अजूनही या आजाराचा काही प्रमाणात त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी खास ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी ४० टक्के जणांना गेले काही महिने श्वास लागणे, छातीत दुखणे, हृदयाविषयीच्या समस्या, सांधेदुखी, मेंदू व मज्जारज्जू यांच्या समस्या असे त्रास होत आहेत. अशा रुग्णांची दखल घेऊन त्यांना पुन्हा आरोग्य बहाल करण्यासाठी ‘रिकव्हरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञांचे एक पथक नेमण्यात आले आहे.

डॉ. लक्ष्मण जेसानी, संसर्गजन्य – सल्लागार, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, कोरोना मधून बरे झालेले अनेक रूग्ण आमच्याशी संपर्क साधून काही लक्षणे सांगत आहेत. अशा रूग्णांना होणाऱ्या त्रासांची दखल घेण्यासाठी व त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही रिकव्हरी क्लिनिक सुरू केली आहेत. कोविडनंतरच्या काळजीसाठीचे हे खास दवाखाने रूग्णांना आवश्यक ते विशिष्ट उपचार मिळवून देण्यासाठी मदत करतील. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत आणि चिकित्सकांनाही प्रशिक्षण दिले आहे. ही क्लिनिक्स रुग्णांना कोरोनाच्या परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करतील.

कोरोनामुळे शरीरातील जवळजवळ सर्व महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. ‘स्ट्रोक’ आणि हृदयविकाराचा झटका या गंभीर घटनांव्यतिरिक्त, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखी तीव्र परिस्थिती उद्भवणे हे ‘कोविड’च्या आजाराचे दुष्परिणाम आहेत. कोविड होऊन गेल्यानंतरही अनेक रुग्ण अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे आणि त्यापैकी बहुतेकांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, असेही दिसून आले आहे.

डॉ. जयालक्ष्मी टी. के, सल्लागार -पल्मोनॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाल्या, कोरोनाचे विषाणू हे केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर शरीरातील इतर अवयवांवरही हल्ले करतात आणि त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. तीव्र स्वरुपात कोरोना झालेल्या व उपचार घेऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये काही आठवडे किंवा काही महिन्यांनंतर काही लक्षणे पुन्हा दिसू लागतात. या रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. ज्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले, अशांमध्ये आरोग्याच्या समस्या दीर्घ काळ राहतात, असे दिसून आले आहे. कोविडचा तीव्र आजार नसलेल्या रुग्णांमध्येही ते बरे झाल्यानंतर विषाणूचे दुष्परिणाम बराच काळ राहतात. काहींच्या दीर्घकालीन समस्या गंभीरही होतात. विशेष ‘रिकव्हरी क्लिनिक’ मुळे रुग्णांच्या लक्षणांचे निरीक्षण करणे आणि त्यांना गरजेनुसार तातडीने उपचार देणे शक्य होणार आहे.’’

नवी मुंबई येथील ‘अपोलो हॉस्पिटल्स’चे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी व युनिटचे प्रमुख संतोष मराठे म्हणाले, कोरोना पूर्वीही आम्ही ‘नॉन कम्युनिकेबल’ आजारांच्या त्सुनामीचा सामना करीत होतो. कोरोनाच्या साथीमुळे हे आव्हान अधिक तीव्र झाले आहे. कोरोना पश्चात उद्भवणाऱ्या लक्षणांमुळे या ‘नॉन कम्युनिकेबल’ आजारांच्या प्रमाणात भरच पडली आहे. कोरोना मधून बऱ्या झालेल्या, मात्र आता इतर आजारांची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांकडे वेळीच विशेष लक्ष न दिल्यास, त्यांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर होतील. कोरोना ’मधून बरे झालेले व आता अनेक तक्रारी करणारे सुमारे २५० रुग्ण आमच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये (ओपीडी) आहेत. येथे या रुग्णांमधील कोरोना पश्चात तीव्र लक्षणे वाढू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. ‘कोव्हॅलेसंट प्लाझमा’च्या चाचण्या व त्याचे दान हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका ‘एनएमएमसी’ च्या सहकार्याने राबविण्याबरोबरच ‘अपोलो हॉस्पिटल’मध्ये रुग्ण-केंद्रित, सर्वसमावेशक, टेलिमेडिसिन क्लिनिक पद्धतींनी सुद्धा कोरोनावर उपचार करण्यात येतात.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.