जागर नवदुर्गेचा
माळ चोथी
'कूष्मांडा'
सिंहारूढ, अष्टभुजा, सूर्यासम तेजस्वी असलेल्या हे सूर्यमंडलनिवासिनी;
आदिस्वरूपा हे कूष्मांडा देवी, पूजन तुझे खास नवरात्रातील चतुर्थ दिनी…
पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टी निर्मिती झाली नव्हती, सर्वत्र अंधार होता; तेव्हा या देवीने स्वतःच्या मंदहास्याने या सृष्टीची म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. म्हणून या देवीला सृष्टीची आदिशक्ती म्हटले जाते. ब्रह्मांडरचनेनंतर देवीने ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रिदेवांची व सरस्वती-लक्ष्मी-काली या त्रिदेवींस ही उत्पन्न केले. असे हे या देवीचे रूप संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करणारे आहे.
या देवीच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र व गदा आहे आणि आठव्या हातात सर्वसिद्धि व निधी प्रदान करणारी जपमाळ आहे. देवीचे वाहन सिंह असून या देवीला कोहळा प्रिय आहे. म्हणून नवचंडी यज्ञात देवीला कोहळा अर्पण केला जातो. तसेच संस्कृतमध्ये कोहळ्याला ‘कूष्माण्ड’ असे म्हणतात. त्यामुळे या देवीला कूष्मांडा असे संबोधिले जाते.
सूर्यमंडलात राहण्याची शक्ती क्षमता केवळ या देवी रूपातच आहे. त्यामुळे सूर्यासमान या देवीची शरीरकांती व प्रभा ही ब्रह्मांडात दाही दिशांना दैदीप्यमान करणारी आहे.
या देवीच्या उपासनेतील साधकाचे मन अनाहत चक्रातील अवस्था प्राप्त करते तर या देवीच्या कृपेमुळे भक्तांस दीर्घायु, यश, बल व आरोग्य, सुख-समृद्धी, उन्नती प्राप्त होते.
✍️ लेखिका ✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.
Be First to Comment