Press "Enter" to skip to content

आजिया मनुष्य गौरव दिन

आजिया मनुष्य गौरव दिन

आज 19 ऑक्टोबर ..संपूर्ण स्वाध्याय परिवारासह देश परदेशातील दादांचे अनुयायी आज मनुष्य गौरव दीन साजरा करत आहेत.आज स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्मदिन आणि तोही शंभरावा! हिंदू धर्मशास्त्र सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे,प्रवचनकार आणि स्वाध्याय परिवाराचे जन्मदाते अशी जरी त्यांची ओळख असली तरी त्यांचे कार्य अफाट आहे,सागराचे आकारमान मोजायचे नसते,दादांचे कार्य त्याच तोडीचे ! किंबहुना केल्या कार्याचा गवगवा करणे हा त्यांचा स्वभावच नव्हता..धर्मशास्त्र सोपे करुन उलगडून दाखविण्याचा तर त्यांचा गाढा अभ्यास. दादाजींचे अनुयायी आजचा दिवस मनुष्य गौरव दीन म्हणून साजरा करत असतात.

अध्यात्म आणि समाजकारण यांच्या योग्य मिलाप साधला गेला, तर काय चमत्कार होऊ शकतो हे `दादां’नी दाखवून दिलं.

दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला.
      बाबा आणि बुवाबाजींच्या गर्तेत अडकलेल्या धर्मशास्त्राला लौकिकार्थाने त्याचे स्थान मिळवून देण्यात दादांचा सिंहाचा वाटा.भारतीय तत्वज्ञानाचा वापर स्वयम् उद्धारासाठी करण्याचे कसब दादांनी शिकवले.संस्कृत आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचे गाढे अभ्यासक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून सुद्धा दादा तितकेच साधे आणि सोपे रहात. हलके स्मित चेहेऱ्यावर कायम ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या नुसत्या दर्शनानेच मन प्रसन्न होत असे.ठाणे,रायगड गुजराथ च्या किनार पट्टीवरील भागात दादांचे अनुयायी मोठ्या संख्येने आढळतात.तसे ते सर्वत्र आहेत म्हणजे अगदी देश परदेशात सुद्धा..
    दादांनी स्वाध्याय परिवाराची स्थापना 1954 साली केली.स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन,आपणच आपले गुरू होण्याची क्लृप्ती.यातूनच दादांनी परिवाराला नवनवे प्रयोग करायला शिकवले. स्वअध्यायनाचा पायाच दादांनी उभारला असे म्हटले तर ते अजिबात वावगे होणार नाही.धर्मशिक्षण जर जाड जूड ग्रंथात बंदिस्त केले तर सामान्य माणूस ते कसे मिळवणार? हा वास्तववादी विचार सर्वप्रथम दादांनी केला.त्यामुळे क्लिष्ट ग्रंथ,पोथ्या,अध्याय यापेक्षा स्वानुभवातून धर्म शिका,तत्वज्ञान शिका अशी त्यांची शिकवण असे,त्यासाठी 1958 मध्ये त्यांनी तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली.

आपल्या क्रांतिकारी `स्वाध्याय’ चळवळीची सुरुवात त्यांनी 1954 साली गुजरातमधील सौराष्ट्र विभागात केली. बघताबघता या चळवळीला एका खूप मोठय़ा `परिवारा’चं स्वरूप प्राप्त झालं. लाखो गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गांतील तरुण मुले-मुली आणि स्त्री-पुरुष यात सामील झाले. हे सर्व जण जाती-धर्मांच्या भिंती तोडून ईश्वरी प्रेमाचा साक्षात्कार घडवू लागले. अध्यात्माच्या शक्तीतून आश्चर्यकारकरीत्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडू लागले. मुख्यत: गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे एक लाख गावांपर्यंत ही चळवळ पोहोचली. स्वाध्याय परिवारानं सहकारी तत्त्वावर शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड अशा अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली चळवळ चार दशकांत अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान, पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. `रिलिजस इकॉनॉमिस्ट’ असा त्यांचा गौरव झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजेस काढली. भगवद्गीतेतील अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांची योग्य सांगड त्यांनी घातली. त्यातूनच मच्छीमारांना एक दिवसांचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबीयांसाठी वापरण्याचा `मत्स्यगंधा’ उपक्रम जवळजवळ वीस वर्षे यशस्वीपणे चालला. `योगेश्वर कृषी’सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला.
         पश्चिम किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचा विचार केल्यावर दादांच्या असे लक्षात आले की शिक्षण न मिळाल्यामुळे हा समाज व्यसनाधीन होत आहे.त्यातच शारीरिक श्रमाचे काम करत असल्यामुळे   शिनवता घालवण्यासाठी व्यसने जवळ केली जात आहेत,त्यावेळी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून दादांनी आयोजित प्रवचनाला गुजराथ च्या कांडला पासून ते अगदी गोव्याच्या मुरगाव बंदरातील मच्छिमार बांधवांनी गिरगाव चौपाटी वर गर्दी केली होती.सोप्या आणि साध्या उदाहरणातून दादा मोठमोठे तत्वज्ञान उलगडून दाखवत असत.
    धार्मिक सुधारणा करणाऱ्या अवलियांना दिला जाणारा टेंपलटन  पुरस्कार दादांना  1997 साली लंडन मध्ये देण्यात आला.प्रिन्स फिलिप यांनी तो दादांना प्रदान केला.त्या नंतर दोनच वर्षात दादांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्याच वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला.इतके राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवून सुद्धा दादांचे वागणे बोलणे अत्यंत नम्र असे.प्रवचनाच्या निमित्ताने कुठेही असले तरी गुरुवारी मात्र ते गिरगावच्या  प्रार्थना समाज हॉल मध्ये नित्यनेमाने येऊन अनुयायींना भेटत.
       देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत, दोन पाय दिले आहेत, वाणी दिली आहे.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या पेक्षा बुध्दी आणि तिचा वापर करण्याचे कसब दिले आहे.त्यामुळे त्याच्या पुढे हात जोडून काही मग्ण्यापेक्षा त्याचे आभार माना.आपले इप्सित आपण प्रामाणिक प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवायचे असते..असे सोपे परंतु अत्यंत गहिरे तत्वज्ञान सांगणारे दादा किती ज्ञानी असतील याची कल्पना येते.रोजच्या जीवनातली,साधी उदाहरणे देत दादा त्यांचा मुद्दा पटवून देत.एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व,हिंदू धर्म तत्वांचे वास्तववादी पुरस्कर्ते अशा दादांनी 25 ऑक्टोबर 2003 रोजी या जगाचा निरोप घेतला.गीतेतील कर्मयोगी आणि तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आपल्यातून निघुन गेले.
स्वाध्याय परिवाराचे अगम्य आणि सजग कार्य मोजता येण्याच्या पलीकडले आहे,त्यांना ऊर्जा,प्रेरणा आणि दिशा देणाऱ्या दादाजिंना विनम्र अभिवादन!!!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.