सियाचीन मधल्या जवानांसाठी उभारला प्राणवायू प्लांट
साधा श्वास ही देखील चैनीची बाब असलेल्या सियाचिनसारख्या जगातल्या सर्वांत उंच युद्धभूमीवर प्राणाची बाजी लावत तैनात असलेल्या हजारो जवानांना आता पुणेकर ‘ऑक्सिजन’ देणार आहेत. दर वर्षी २० हजार जवानांना पुरेल इतका ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणाच पुणेकरांनी सियाचिन येथे उभारली आहे. त्यामुळे निसर्ग हाच मोठा शत्रू असलेल्या या अतिदुर्गम भागात केवळ ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे जवानांचे मृत्यू टळू शकतील.
जवानांविषयी नितांत आदर असलेल्या पुणेकर चिथडे दाम्पत्याची अथक मेहनत, समाजाने त्याला दिलेली साथ आणि सैन्याने दाखवलेला विश्वास यातून ‘सियाचिन फिल्ड हॉस्पिटल’ येथे ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ उभा राहिला असून त्याद्वारे एका अर्थाने पुणेकरांच्या माध्यमातून सियाचिनमधील जवानांना ‘ऑक्सिजन’च्या रूपात नवसंजीवनीच मिळणार आहे. रेणुका स्वरूप शाळेच्या शिक्षिका सुमेधा तसेच त्यांचे पती योगेश १९९९ पासून चालवत असलेल्या ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ (सिर्फ) या ट्रस्टच्या माध्यमातून सियाचिन येथील हॉस्पिटलमध्ये ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ उभा राहिला आहे. त्याचे उद्घाटन चार ऑक्टोबर रोजी लष्कराच्या ‘१४ कोअर’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी सुमेधा व योगेश चिथडे तसेच ‘सिर्फ’चे उपाध्यक्ष चंद्रशेखर बोरोले व खजिनदार शोभा बोरोले उपस्थित होते. जर्मनी येथील कंपनीकडून ही अत्याधुनिक यंत्रणा आयात करण्यात आली. त्यासाठी तसेच या केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च आला.
‘सियाचिन येथील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने अगदी धडधाकट जवानांसाठीही ‘एक श्वास, एक पाऊल’ असे इथले समीकरण आहे. येथील ‘बेस हॉस्पिटल’मधूनच जवानांसह, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांवरही उपचार होतात. आरोग्यविषयक मुख्य तक्रार ही ऑक्सिजनची कमतरता हीच असते. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो, यामुळे आम्ही येथे ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारण्याचे ठरवले,’ असे योगेश चिथडे म्हणाले. ‘निस्वार्थ भावनेने आपल्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या जवानांचे आपण देणे लागतो. त्यांच्यासाठी लष्कर काम करत असले, तरी त्यात आपलाही वाटा असला पाहिजे, नागरिकांच्या निधीतून हे केंद्र उभे राहावे, असे आम्ही ठरवले,’ असे सुमेधा चिथडे यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी सुमेधा यांनी सुरुवातीला स्वत:चे दागिने मोडून सव्वा लाख रुपयांचा निधी उभा केला. त्यानंतर लष्कराविषयी माहिती देणाऱ्या व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी उर्वरित निधी उभारला. याद्वारे सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक सामान्य नागरिक काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरणच चिथडे दाम्पत्याने सर्वांसमोर ठेवले आहे.
चिथडे यांच्या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन अनेक सर्वसामान्य नागरिकांनी ही मोहीम स्वत:ची मानून काम केले. घरोघर वृत्तपत्र टाकणारी मुले, घरकाम करणाऱ्या महिला, आठ वर्षांच्या मुलीने पिगी बँकेतून दिलेले सर्व पैसे, अश्विनी पाटील, सोनाली फराटे, मधुलिका चव्हाण-बापट या तिघा वीरपत्नींनी आपापले एक महिन्याचे निवृत्तीवेतनही या कामासाठी दिले. याशिवाय काही कंपन्या, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीतूनच हा भव्य प्रकल्प साकारला, असे चिथडे यांनी सांगितले.
देवाने दिलेली बुद्धी, लष्कराने दिलेली संधी आणि समाजाने दिलेली साथ यातूनच हे ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभे राहिले.
- सुमेधा व योगेश चिथडे, ‘सिर्फ’
असे आहे ऑक्सिजन केंद्र
सर्वसाधारण वातारणात ऑक्सिजनसोबतच हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि धुळीचाही समावेश असतो. त्यापैकी आपल्याला फक्त ऑक्सिजनच गरजेचा असतो. सियाचिनला बसवलेल्या या यंत्रणेद्वारे दर वर्षी २० हजार व्यक्तींना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो. त्यातून लष्कराच्या सर्वोच्च उंचीवरील ठाण्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जाईल.
Be First to Comment