जागर नवदुर्गेचा
माळ दुसरी
*ब्रह्मचारिणी '*
भगवान शंकराच्या पतिरुप प्राप्तीची तपश्चारिणी, हे ब्रह्मचारिणी;
नमन तुला त्रिवार सर्वसिद्धीदात्री, हे कराक्षमालाकमंडलूधारिणी…
ब्रह्म याचा अर्थ तप व चारिणी म्हणजे आचरण करणारी म्हणून या देवीस तपश्चारिणी असेही म्हणतात. ही देवी ब्रह्मपद प्राप्त करून देणारी अशी मोक्षदायिनी आहे. हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून हिच्या एका हातात रुद्राक्षाची माळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. या देवीच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य, संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात अशी उपासकांची श्रद्धा आहे.
पूर्वजन्मात या देवीने हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला होता व नारदमुनींच्या उपदेशाने हिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली.
तपश्चर्येच्या काळात एक हजार वर्षे या देवीने फळे-फुले खाऊन तर शंभर वर्षे भूतलावर राहून भाज्यांवर उदरनिर्वाह केला. काही दिवस कठीण उपास करीत या खुल्या आकाशाखाली पाऊस, ऊन-वारा सहन करून तीन हजार वर्षे सुकलेलीे बिल्वपत्रे खात या देवीने शंकराची आराधना केली. नंतर काही हजार वर्षे निर्जल व निराहार राहून तपश्चर्या केली. तेव्हा सुकलेली बिल्व पत्रे खाणेही तिने सोडले म्हणून या देवीस ‘अपर्णा’ या नावाने ही संबोधिले जाते.
अशा प्रकारच्या कठीण तपश्चर्येमुळे शरीराने क्षीण झालेल्या या देवीची सर्व देव, ऋषीमुनी, सिद्धगण यांनी अभूतपूर्व पुण्यकृत्य म्हणून प्रशंसा केली व तिला ‘तुझी मनोकामना परिपूर्ण होईल. तुला भगवान चंद्रमौळी-शिव पतीरुपात प्राप्त होईल,’असा आशीर्वाद दिला.
ब्रह्मचर्य म्हणजे शरीरापासून अलिप्तता स्वीकारून आपल्या तणावमुक्त अनंत अस्तित्वाचा आनंदाने अनुभव घेत स्वतःला ज्योती स्वरूप जाणणे. ज्यावेळेस आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना आनंदाचा अनुभव घेऊन मूळ स्वभावानुसार आपण शूर, निडर, पराक्रमी व सामर्थ्यशाली बनतो.
✍️लेखिका✍️
श्वेता जोशी
नवीन पनवेल.
Be First to Comment