पनवेल मधील खाजगी रुग्णालयांचे लेखापरीक्षण करा… प्रहार जनशक्ती पक्षाची आयुक्तांकडे मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक खाजगी रुग्णालय आपले सामाजिक भान विसरून सर्वसामान्य लोकांची आर्थिक लुट करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पनवेल महानगरपालिका ही रोखू शकली नाही.
त्यामुळे महानगरपालिकेकडे आरोग्यासंदर्भात असलेल्या पायाभूत सुविधा कमी असल्यामुळे महापालिकेने काही खाजगी रुग्णालयांसोबत करार करून कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु काही खाजगी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांनी स्वतःच्या सामाजिक जाणीवा विसरून आपल्या वैद्यकीय सेवेचा बाजार मांडल्याचे दिसते आहे. अनेक खाजगी रुग्णालये हे दोन ते तीन दिवसाचे बिल लाखोंच्या घरात आकारत असल्याच्या तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाकडे येत असल्याचे संतोष गवस यांनी सांगितले.

खाजगी रूग्णालयांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे सांगतानाच राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा दर आकारात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा मुजोर रुग्णालयांवर बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अधिनियम, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळनुसार पर्यावरण (संरक्षक) अधिनियम १९८६ व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ प्रमाणे खाजगी रुग्णालय यांनी वरील कायद्यांतर्गत सर्व निकष, OC, NOC आणि आवश्यक परवानग्यांची पूर्तता केली व कसे याची सखोल चौकशी ज्या खाजगी रुग्णालयांने नियमांची पायमल्ली केली असल्यास त्या सर्व रुग्णालयांचे लेखापरीक्षण करून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गवस यांनी पालिका आयुक्तांना भेटून निवेदनाद्वारे केली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.







Be First to Comment