Press "Enter" to skip to content

आता कोरोनापेक्षा उपासमारीची भीती

भुकेने घालवली कोरोनाची भिती !


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

देशात व राज्यात कोरोना कोविड १९ ने हाहाःकार माजवला आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वारंवार लॉकडाऊन घेतला जात आहे. परंतु कोरोना कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. त्यात वारंवार घेतल्या जात असलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची भीती कमी परंतु उपासमारीची भीती जास्त वाटत त्यात बळी जाण्याची शक्यता जास्त दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मार्च महिन्यापासून आजतागायत अनेकवेळा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी लॉकडाऊनचे आमजनतेने स्वागत केले होते. मात्र त्यानंतर त्यामध्ये वाढ होत गेल्याने हाती होते ते सर्व पैसे संपले परंतु दोन पैसे मिळण्याचे व्यवसाय मात्र सुरू होण्याचे नाव नाही. यामुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे कोलमडून पडली आहे.
आता पुन्हा एकदा रायगड जिल्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लॉकडाऊन घेणे आवश्यक आहे. परंतु सारखे सारखे लॉकडाऊन घेणे हा त्यावर एकमेव उपाय ठरू शकतो का? असा सवाल या निमित्ताने उभा रहातो. अनेकवेळा लॉकडाऊन घेऊन ही कोरोनाचे संकट जाण्याऐवजी ते वाढताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी दुसरे पर्याय वापरण्यास हरकत नाही.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या भीतीपोटी अनेकवेळा घेतलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. आधीच कोणताही कामधंदा नसल्याने हाती असलेले दोन पैसेही आता संपले आहेत. मग घरखर्च कसा भागवायचा अशा संभ्रमात असताना परत एकदा लॉकडाऊन घेतल्याने हाती नाही पैसा आणि घरात नाही अन्नधान्य मग जगायचे कसे असा सवाल सर्वसामान्य जनता शासनकर्त्यांना करीत आहे. शासनाकडून अनेक योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबविल्या आहेत. परंतु त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचतच नाही. तर त्यांच्या नावाने भलतेच फायदा घेऊन जात आहेत. याचीही सखोल चौकशी केली तर नक्कीच हे घोटाळे उघडकीस येतील अशी चर्चा सुरू आहे.
वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती आता पूर्णपणे संपली असून घरात काही खायला अन्नधान्यच नसल्याने उपासमारीने कोरोनापेक्षा अधिक बळी जाण्याची भीती सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. तरी शासनाने याचा जरुर विचार करून लॉकडाऊन ऐवजी वेगळा पर्याय अथवा सर्वसामान्य जनतेला कमीत कमी दोन वेळच्या अन्नाची तरी सोय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.