आयपीएल Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर ‘करा किंवा मरा’ हे संकट कायम आहेच. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या परतीच्या सामन्यात धोनीनं आक्रमक रणनीती वापरली. फलंदाजांच्या क्रमवारीत थोडासा बदल अन् गोलंदाजीतले डावपेच याच्या जोरावर चेन्नईनं हा सामना जिंकला. केन विलियम्सननं CSKच्या गोटात तणाव कायम ठेवला होता.
राशिद खाननं दमदार फटकेबाजी करून हैदराबादच्या आशा कायम राखल्या, परंतु शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा CSKसाठी धावला. या सामन्यात पुन्हा धोनीचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि तो रुद्रावतार पाहून अंपायर पॉल रैफेल यांनी निर्णय बदलला.
फॅफ ड्यू प्लेसिस आणि कुरन यांनी CSKच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्मानं CSKला ड्यू प्लेसिसच्या (०) रुपानं पहिला धक्का दिला. करननं फटकेबाजी केली. संदीप शर्मानं त्याचा अडथळा दूर केला. करन २१ चेंडूंत ३१ धावांवर माघारी परतला. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तिसऱ्या विकेटसाठई ८१ धावांची भागीदारी केली. खलील अहमदनं SRHला यश मिळवून देताना रायुडूला ( ४१) बाद केले. पुढच्याच षटकात टी नटराजननं CSKला आणखी एक धक्का दिला. वॉटसन ३८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. धोनी १३ चेडूंत २१ धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजानं १० चेंडूंत २५ धावा करताना चेन्नईला ६ बाद १६७ धावांचा पल्ला गाठून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( ९) व मनीष पांडे ( ४) फारवेळ खेळपट्टीवर टीकले नाही. सॅम कुरननं वॉर्नरचा अडथळा दूर केला, तर ड्वेन ब्राव्होनं अचूक नेम धरताना पांडेला धावबाद केले. ड्वेन ब्राव्होनं ०२.९२ सेकंदात मनीष पांडेला धावबाद करून माघारी पाठवले. जॉनी बेअरस्टो व केन विलियम्सन यांनी हैदराबादचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजानं SRHला धक्का दिला. बेअरस्टो २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. केन आज चांगल्या फॉर्मात दिसला आणि त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. आक्रमकतेपेक्षा त्याच्या फटक्यांमधल्या अचूक टायमिंगनं धोनीला हैराण केलं. त्यानं प्रियाम गर्गला सोबत घेऊन ४० धावा जोडल्या. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर फटका मारण्याचा मोह गर्गला ( १६) महागात पडला. रवींद्र जडेजानं त्याचा झेल टिपला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या SRHला पहिल्या १० षटकांत तीन धक्के बसले. पण, केन खिंड लढवत होता. त्यानं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
अखेरच्या तीन षटकांत ४६ धावांची गरज असताना केननं फलंदाजीचा गिअर बदलला. १८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारून केननं इरादा स्पष्ट केला. मात्र, पुढच्याच चेंडूवर कर्ण शर्मानं त्याला शार्दूल ठाकूरकरवी झेलबाद केले. केननं ३९ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ धावा केल्या. उरलेली कसर राशिद खाननं पूर्ण केली. कर्णच्या त्या षटकात १९ धावा आल्या. धोनीनं शार्दूल ठाकूरच्या हाती चेंडू सोपवला आणि १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्यानं राशिदला ( १४) बाद केले. मग काय ब्राव्होनं चेन्नईचा विजय पक्का केला. SRHला ८ बाद १४७ धावाच करता आल्या आणि CSKनं २० धावांनी विजय मिळवला.
Be First to Comment