पार्ले येथील जमिनीच्या वादातून झालेल्या खुनामागे वेगळीच कहाणी ? 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔶
तालुक्यातील पार्ले बौध्दवाडी येथे लॉकडाऊनपुर्वीच्या मर्डर केसमध्ये अचानक वेगळे वळण निर्माण झाले असून आधी अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या या प्रकरणात काही कालावधीनंतर जमिनीच्या वादातून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आताही या खुनाच्या प्रकरणात अचानक वेगळेच वळण आल्याने ‘जमीन राहिली जागेवरच अन् नवीन मालक गेले ढगात’ अशी उत्कंठावर्धक परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील आरोपींची संख्या वाढली असून आरोपींकडून अधिक तपास घेण्यासाठी त्यांच्या रिमांडमध्येही वाढ करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्ले बौध्दवाडी येथे जयेंद्र मारूती साळवी याचा दि.13 मार्च 2020 रोजी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद झाल्यानंतर काही कालावधीने पोलादपूर पोलीस ठाण्यात 15-2020 नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी पार्ले बौध्दवाडी येथील नागेश मारूती साळवी (वय 50) याने दि. 17 मार्च 2020 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार पार्ले येथील राम उर्फ दुदूस्कर उर्फ खोत्या आत्माराम मोरे याच्याकडून दि.13 ऑगस्ट 1998 रोजी मयत जयेंद्र मारूती साळवी याने 28 गुंठे जमीन विकत घेतली होती.
मात्र, खोत्या मोरे मयत झाल्यानंतर त्याच्या भावकीमधील बळवंत महादेवराव मोरे याने सदरची जमीन त्यांचीच असल्याचे सांगून परत देण्यास सांगून तगादा लावला आणि जयेंद्र यास वारंवार धमकावले होते. त्यामुळे बळवंत मोरे यानेच जयेंद्र मोरे यास ठार मारले असावे, असे नमूद केले. यानुसार भा.दं.वि.302 कलमाप्रमाणे आरोपी बळवंत महादेवराव मोरे याला आरोपी करण्यात आले. सदरची तक्रार पोलीस हवालदार जाधव यांनी घेतली.
या गुन्ह्यात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी तपासकार्य हाती घेतले. यादरम्यान, लॉकडाऊन सुरु झाल्याने तब्बल तीन महिन्यांनी यातील आरोपीला परराज्यातून ताब्यात घेऊन महाड न्यायालयासमोर हजर केले आणि पोलीस कस्टडीची मागणी केली.
यानंतर या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मयत जयेंद्र साळवी याच्या कुटूंबातील व्यक्तीचे आरोपीसोबत मोबाईलद्वारे संभाषण झाल्याचे दिसून आले असून गुन्हा घडला त्यादिवशीदेखील हे संभाषण सुरू होते आणि महाड नवेनगर मोबाईलचे लोकेशन होते आणि त्यानंतर पनवेल, मुंबई व राजस्थान असे मोबाईलचे लोकेशन असल्याची माहिती प्राप्त झाली. यामुळे मयत जयेंद्र साळवी याच्या मृत्यूचे कारण जमिनीचा वाद आहे अथवा कसे, आरोपीने मयताला जीवे मारण्यासाठी कोणत्या हत्याराचा वापर केला ते हत्यार हस्तगत करण्याची गरज निर्माण झाल्याने तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी साक्षीदार आहे, अथवा कसे याची चौकशी करण्याकामी आरोपीस 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या अकस्मात प्रकरणात तक्रार दाखल करण्यात झालेला विलंब आणि अचानक मिळणाऱ्या कलाटण्यांनी हे खुन प्रकरण अतिशय उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचले आहे. मात्र, आणखी कोणी साथीदार आढळल्यास हे प्रकरण कोणते वळण घेऊ शकेल, याचा अंदाज लावणारे ‘जमीन राहिली जागेवरच अन् नवीन मालक गेले ढगात’ अशी चर्चा करताना दिसत आहेत.







Be First to Comment