जॉनी बेअरस्टो (97) आणि डेव्हिड वॉर्नर (52) यांच्या 160 धावांच्या भागीदारीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने उभे केलेले द्विशतकी आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाबला पेलवले नाही, त्यांचा डाव 132 धावांत गुंडाळला गेल्याने हैदराबादला तब्बल 69 धावांनी विजय मिळाला. तीन धावांनी शतक हुकलेल्या जॉनी बेअस्टोला ‘सामनावीर’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
201 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. भरवशाचा कर्णधार के. एल. राहुल 11 धावांवर बाद झाला. यष्टिरक्षक सिमरन सिंगनेही तितक्याच धावा केल्या. निकोलस पूरन याने मात्र धडाकेबाज खेळी करीत 37 चेंडूंत 77 धावा केल्या; पण उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता न आल्याने पंजाबचा डाव 132 धावांत संपला.
हैदराबादकडून रशीद खानने 12 धावांत 3 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची पहिल्या षटकापासून धुलाई सुरू केली. ‘पॉवर प्ले’च्या सहा षटकांत दोघांनी नाबाद 58 धावांची भागीदारी केली. वॉर्नरच्या तुलनेत बेअरस्टो आक्रमक होता. त्याने 28 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. केवळ 60 चेंडूंत संघाचे शतकही फलकावर लागले. पाठोपाठ वॉर्नरनेही आपले अर्धशतक गाठले. यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. चौदाव्या षटकांत दोघांनी दीडशे धावांची सलामी दिली.
वॉर्नर आणि बेअरस्टो ही यशस्वी सलामीची जोडी ठरत असून, त्यांनी आयपीएलमधील 16 डावांत हजार धावांची भागीदारी पूर्ण केली. अशी कामगिरी करणारी ही सातवी जोडी आहे.
पंधराव्या षटकानंतर स्टेटर्जिक टाईम आऊट घेण्यात आला. त्यानंतर खेळ सुरू झाला. परंतु, वॉर्नर आणि बेअरस्टोची लय तुटली. रवी बिश्नोईने आधी वॉर्नरला मॅक्सवेलकडे झेल देण्यास भाग पाडले आणि पुढच्याच चेंडूवर शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या जॉनी बेअरस्टोला पायचित केले. बेअरस्टो अवघ्या तीन धावांनी शतकापासून वंचित राहिला. 160 धावांची ही भागीदारी 15.1 षटकांत संपुष्टात आली.
यानंतर मनीष पांडे आणि अब्दुल समद ही नवीन जोडी मैदानावर आली. परंतु, अर्शदीपने मनीषला चकवले आणि स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. मनीष एका धावेवर बाद झाला. त्यामुळे हैदराबादचा धावफलक बिनबाद 160 वरून 3 बाद 161 असा झाला. यानंतर अब्दुल समदही लगेच बाद झाला. बिश्नोईच्या गोलंदाजीवर अर्शदीपकडे झेल देणार्या अब्दुलने 8 धावा केल्या. हैदराबादची गळती पुढेही सुरू राहिली. प्रियम गर्गला अर्शदीपने शून्यावर तंबूत धाडले. अभिषेक शर्माने 6 चेंडूंत 12 धावा केल्याने सनरायजर्स हैदराबादच्या 20 षटकांत 6 बाद 201 धावा झाल्या.
सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकांत 6 बाद 201 धावा. (जॉनी बेअरस्टो 97, डेव्हिड वॉर्नर 52, रवी बिश्नोई 3/29, अर्शदीप सिंग 2/33.)
किंग्ज इलेव्हन पंजाब : 20 षटकांत सर्वबाद 132 धावा. (निकोलस पूरन 77, के. एल. राहुल 11, रशीद खान 3/12, नटराजन 2/24.)
Be First to Comment