चोरी करतांना पत्र्यावरून खाली कोसळून झाला गंभीर जखमी..! 🔷🔶🔷
मढाळी येथील बंगल्यावर चोरी करणारे तिघे चोर पाली पोलिसांच्या अटकेत ; जखमी चोर घेतोय उपचार 🔶🔷🔶
पोलीस स्थानकात फिर्यादीला चोराची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पाली । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
सुधागड तालुक्यात मागील अनेक वर्षे हिवाळ्यात लोक साखरझोपेत असताना झालेल्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. चोरट्यांनी पुन्हा सुधागडकडे मोर्चा वळविला आहे. सुधागड तालुक्यातील मढाळी गावाजवळील एका बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी 4 चोर घुसले होते. आणि यातील एक चोर इन्व्हर्टरची अवजड बॅटरी चोरून नेत असतांना पत्रा तुटून बॅटरीसह तो खाली कोसळला आणि जबर जखमी झाला आहे. पाली पोलिसांनी यातील 3 चोरांना पकडून अटक केली असून जखमी चोर उपचार घेत आहे.
या बाक्या प्रसंगातही चोरांनी डाव साधला आणि याही अवस्थेत हाताला मिळालेला टीव्ही, 2 फॅन आणि 2 लोखंडी पाईप पळवून नेले. ही घटना 26 सप्टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. आणि शनिवारी (दि.3) पाली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. तर सोमवारी (दि.4) पाली कोर्टाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. या चोरीत मिथुन भोईर (वय 30), दिनेश जाधव (वय 26), लक्ष्मण वाघमारे (वय 33) आणि विजय हिलम सर्व सर्व राहणार मढाळी आदिवासीवाडी, तालुका सुधागड. यातील विजय हिलम हा जखमी असून इतर तिघे अटकेत आहेत.
या चोरांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर खिडकीचे ग्रील वाकवून काच फोडून प्रवेश केला. त्याआधी कोयत्याने बंगल्याभोवती असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. या बरोबरच चोरांनी प्लास्टिक पाईप व इन्व्हर्टरची बॅटरी फोडून नुकसान केले आहे. हे चारही चोर कॅमेऱ्यात दिसले आहेत. हा बंगला संगीता शरद अरुळेकर रा. नेरुळ यांचा आहे. तर या बंगल्याची देखरेख पालीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांच्याकडे आहे. या आधी देखील या बंगल्यात चोरीचे प्रकार झाले आहेत असे कपिल पाटील यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. डी. बहाडकर करत आहेत. दरम्यान पोलीस स्थानकात तक्रार लगेच दाखल होत नाही अशा तक्रारी ऐकावयास येत आहेत. पाली पोलीस स्थानकात चोरी किंवा कुठलीही तक्रार द्यायला गेलो तर पोलीस अंमलदार तक्रार घेण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी येण्याची किंवा त्यांच्या सुचनेची वाट पाहतात. तक्रार लगेच दाखल करून घेतली जात नाही.
फिर्यादीला चोरासारखी वागणूक दिली जाते. त्यांच मनोबल कमी करण्याचा प्रकार होतो. जणू घडल्या प्रकाराला स्वतः तेच जबाबदार किंवा आरोपी आहेत असे वागविले जाते.
आपण केलेल्या ताबडतोब हालचाली व अर्जाकडे दुर्लक्ष केले जाते. आणि प्रत्यक्षात FIR दाखल केल्यावर कृती केली जाते. तरीसुद्धा पोलिसांनी आरोपीना पकडून केलेल्या तपासाबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे कपिल पाटील, बांधकाम व्यावसायिक व समाजसेवक पाली,यांनी सांगितले.
Be First to Comment