Press "Enter" to skip to content

जेव्हा मेंढपाळाच्या मदतीला आधुनीक “बाळुमामा धावतो”

सुमंतु हाॅस्पिटलचे डाॅक्टर सुनील ढवले आणि पत्रकार जगदिश दगडे ठरले मेंढपाळाच्या मुलांसाठी देवदुत

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

मेंढपाळ हे पावसाळा ऋतुचे चार महिने सोडले तर उर्वरित महिने जिकडे बक-यांसाठी चारा पाणी मिळेल तिकडे कुटुंबासह भटकंती करत फिरत असतात. असेच काही मेंढपाळ दरवर्षी तालुक्यांतील खेड्यापाड्यात येऊन राहत असतात. त्यापैकीच बारामती येथील मुर्ती गावातील मेंढपाळ भीरु दगडु गलांडे वय वर्षे ४० हे ही आपल्या कुटुंबासह आंबोट ह्या गावाबाहेरील माळ रानावर आपला वाडा टाकून राहत होते. ते आपल्या मेंढ्यांना रानात चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यांच्या दोन लहान मुलांनी सुप्रीया वय वर्षे ८ व साहिल वय वर्षे ६ ह्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना खुपच अस्वस्थ वाटू लागले.

त्यामुळे त्यांनी आपले सहकारी मित्र वसंत सदार यांच्या मदतीने मुलांना कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. परंतु, अत्यावस्थ असलेल्या मुलांवर कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शवली व‌ मुलांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने देखील रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे कारण सांगून मुलांवर उपचार करण्यास नकार दिल्याने त्यांनी मुलांना शहरातील अनेक खाजगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची विनंती केली. परंतु, शहरातील खाजगी दवाखान्यातील डाॅक्टरांनीही त्यांच्या मुलांवर उपचार करण्यास नकार दिला.

दरम्यानच्या काळात मुलांची तब्येत अधिकच बिघडत चालली होती आणि मुलांवर उपचार करण्यास कुणीही डाॅक्टर तयार होत नसल्यामुळे ते मुलांना घेऊन श्रीराम पुलावर रडत बसले होते व मुलं वेदनेने विव्हळत लोळत पडली होती. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जगदिश दगडे श्रीराम पुलावरून जात असताना त्यांनी मुलांची होत असलेली तडफड पाहुन मेंढपाळ भीरु गलांडे ह्यांची विचारपुस केली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुमंतु हाॅस्पिटलचे डाॅक्टर सुनिल ढवळे यांना संपर्क करुन सर्व हकीकत सांगितली. त्यावर डाॅक्टर ढवळे यांनी मुलांना तातडीने हाॅस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. ह्यावर जगदिश दगडे ह्यांनी आपले मित्र नरेश बोरकर व भालिवडे यांच्या मदतीने मुलांना घेऊन सुमंतु हाॅस्पिटलमध्ये धाव घेतली.

मुलांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डाॅक्टर सुनिल ढवळे व त्यांच्या पत्नी डाॅक्टर ईश्वरी ढवळे यांनी मुलांवर तातडीने उपचार करुन दोन्ही मुलांचे प्राण वाचवले. रात्र झाल्यामुळे बाजारपेठेतील सर्व मेडिकल बंद होते परंतु, मुक्ताई मेडिकलचे फार्मासिस्ट अनुज सुरेश गायकवाड यांनी मेडिकल उघडुन आवश्यक असणारी औषधे त्वरित उपलब्ध करून दिली. डाॅक्टर सुनिल ढवळे व त्यांच्या पत्नी डाॅक्टर ईश्वरी ढवळे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.‌ मुलांवर केलेल्या उपचाराची फी देखील त्यांनी घेतली नाही. ह्यावरुन त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते.

मेंढपाळ भीरु दगडु गलांडे ह्यांनी सुमंतु हाॅस्पिटलचे डाॅक्टर सुनिल ढवळे, त्यांच्या पत्नी डाॅक्टर ईश्वरी ढवळे, फार्मासिस्ट अनुज गायकवाड ह्यांचे मनापासुन आभार मानले व पत्रकार जगदिश दगडे ह्यांच्या रुपात आमचा देव “बाळु मामा” प्रत्यक्ष आमच्या संकटात तारणहार म्हणून उभा राहिला असे मेंढपाळ भिक्षु गलांडे यांनी सांगितले.

लोक देव शोधण्यासाठी मंदिर, मुर्ती आणि दर्ग्यांकडे धाव घेतात. पण देव अशाच डाॅक्टर आणि पत्रकार जगदिश दगडेंसारख्या लोकांच्या रुपानं तुमच्या आमच्यासाठी, गोर गरीबांसाठी धावून येतात हे मात्र तितकंच खरं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.