सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
उरण तालुक्याला मंजूर झालेल्या जागेवर हॉस्पिटल तातडीने उभारण्यात यावे या मागणीसाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोबर रोजी घरबैठे मागणी आंदोलन करण्यात येणार आहे. तशा प्रकारचे निवेदन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना संस्थेतर्फे देण्यात आले आहे.
उरण सामाजिक संस्थेच्या प्रयत्नामुळे आणि तत्कालीन आमदार विवेक पाटील व मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे उरण तालुक्याला उपजिल्हा हॉस्पिटलसाठी प्लॉट नंबर १, सेकटर १५ ए, द्रोणागिरी उरण येथे ५९८३ चौमी भूखंड २०१३ साली मंजूर झाला आहे. त्याला ६ वर्षांचा अवधी उलटूनही अद्याप कामाला सुरुवात नाही.
सदर हॉस्पिटल असते तर आजच्या कोरोनाच्या महामारीत उरणकरांचे अनेकांचे प्राण वाचून उपचारही उरणमध्येच झाले असते. मजूर झालेल्या ठिकाणी हॉस्पिटलचे काम त्वरित सुरू व्हावे यासाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १२ या दरम्यान १ तासाचे उरणच्या जनतेचे घरबैठे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आपण सचिव पातळीवर बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना उरण सामाजिक संस्थेने दिलेल्या निवेदनात केली आहे. सदर निवेदन संस्थेचे प्रा. राजेंद्र मढवी व सीमा घरत यांनी दिले.








Be First to Comment