Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये अनावश्यक कामांसाठी करोडो रुपयांचा चुराडा

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔷🔶

एखादया कामातून काही अपेक्षित उत्पन्नाचे साधन प्राप्त होत असेल तर त्यासाठी केलेला खर्च,गुंतवलेल्या पैशाचे हे खरोखरच सार्थक होते. परंतु मागील दोन वर्षांपासून माथेरान नगरपरिषदे मार्फत आणि विविध शासकीय निधीं मार्फत होत असलेला विकासाच्या नावाखाली खर्च हा एकप्रकारे गंगाजळीत असून या अनाठायी खर्चामुळे आजपर्यंत नगरपरिषदेच्या सुध्दा करोडो रुपयांचा अक्षरशः चुराडा झालेला दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या दोन वर्षांत संबंधित ठेकेदारांना नेमून दिलेल्या कामांची अद्यापही पूर्तता झालेली नाही. वारंवार ह्या ठेकेदारांना पाठिशी घालून दोन ते तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे.होत असलेली कामे काही ठिकाणी तर खूपच निकृष्ट दर्जाची असून या कामांवर नगरपरिषदेच्या अभियंत्यांचा तिळमात्र अंकुश नसल्याने अशा ठेकेदारांची शुल्लक आमिषापोटी अभियंते नेहमीच वकिली आणि पाठराखण करताना दिसतात.

विकासकामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासकीय अधिका-यांची अन लोकप्रतिनिधींची याबाबतीत कठोर भूमिका महत्त्वाची आहे.परंतु सध्यातरी याबाबतीत ठोस निर्णय घेण्याविषयी सर्वांचीच मवाळ भूमिका असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

सध्या जो काही विकासाच्या नावाखाली कामांचा सपाटा सुरू आहे त्यामध्ये काहीही तथ्य नसून नगरपरिषदेच्या पैशाचा अथवा विविध निधींचा अक्षरशः अपव्यय होताना दिसून येत आहे. ज्या ठिकाणी काही अडसर निर्माण होणार नाही की त्या वास्तूला संरक्षणाची आवश्यकता आहे अशा हेरिटेज वास्तूंच्या संरक्षणासाठी जांभ्या दगडाच्या संरक्षण भिंती उभारल्या जात आहेत.त्यामुळे एकप्रकारे या जुन्या वास्तूंच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.

तर ज्या रस्त्यांची खऱ्या अर्थाने डागडुजी अन दुरुस्ती अपेक्षित होती ज्या रस्त्यावरून सातत्याने रहदारी असते.तो शारलोट लेक कडे जाणारा रामकृष्ण मंदिर ते शारलोट लेक हा रस्ता दुरुस्ती करण्याऐवजी भलत्याच रस्त्याच्या कामांवर जवळपास एक कोटी रुपयां पेक्षाही अधिक रक्कम खर्च केली जात आहे.ह्या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने पादचाऱ्यांना अडथळा पार करत शारलोट लेकला जावे लागत आहे.याकडे नगरपरिषदेचे अभियंता, मुख्याधिकारी, कार्यतत्पर लोकप्रतिनिधी का डोळेझाक करीत आहे असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे.

जर ह्या सर्व कामांतील ठेकेदारांकडून मुदतीत कामे पूर्ण होत नसतील तर ती काढून घ्यावीत अन एखाद्या कार्यक्षम ठेकेदारांकडून विहीत मुदतीत पूर्ण करून घ्यावीत. आजपर्यंत केलेल्या कामांची बिले सुध्दा काहीशा प्रमाणात अदा केल्याचे बोलले जात आहे तरीदेखील विविध ठिकाणी अपुर्ण कामे दिसत असून अस्तव्यस्त बांधकामाचे साहित्य ठेवल्यामुळे काही ठिकाणी बकालपणा आलेला आहे. अशाच प्रकारे पुढील मंजूर केलेली लाखो रुपयांची कामे होणार असतील तर त्याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे असेही बोलले जात आहे.

आजवर जी काही कामे विकासाच्या नावाखाली सुरू आहेत,आणि निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याला मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने नगरपालिका मधील स्थायी समितीना अधिकचे अधिकार दिल्याने ज्या नगरपालिका मध्ये सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ अधिक आहे त्या पालिकेत आपल्या मर्जीनुसार ठेकेदारांना हव्या तशा कामांची टेंडर मंजूर होतात. व स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना कामाचे आदेश देतात. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घेतली जाते.यामुळे विरोधी सदस्यांना एखाद्या वाढीव दराविषयी अथवा कामाच्या तांत्रिक बाबींविषयी सभागृहामध्ये आपले विचार व्यक्त करता येत नाहीत. जर का नगरविकास खात्याने हे सर्व अधिकार सर्वसाधारण सभेला दिल्यास शासनाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होऊन कामांत पारदर्शकपणा तसेच निकृष्ट दर्जाचे काम होणार नाही.

विरोधी पक्षनेते-- शिवाजी शांताराम शिंदे
माथेरान नगरपरिषद.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.