सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔷🔶🔶🔷
राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज अनेक जण कोरोना बाधीत होतात. तर काहींचा त्यात बळी जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यावर मात करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे उरणमध्ये ही कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जागेची पहाणी करून त्याला जवळ जवळ 10 ते 12 दिवसांचा अवधी उलटूनही ते अद्याप सुरू झालेले नाही.
आज कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन 6 ते 7 महिन्याचा अवधी उलटूनही सोन्याची खाण असलेले उरणकर आजही कोविड हॉस्पिटलच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उरणमध्ये नक्की कोविड हॉस्पिटल सुरू होईल की नाही अशी संशयाची पाल उरणकरांच्या मनात चुकचुकत आहे.
देशावर व राज्यावर कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. ते संपण्याचे नाव घेत नाही.
देशात व राज्यात दररोज अनेकजण कोरोनाने बाधीत होत आहेत. त्यातील काहींचा बळी गेला आहे आणि दररोज जात आहे. कोरोनावर ठोस अशी उपाययोजना सापडलेली नाही. त्यामुळे शासनाकडून अनेक ठिकाणी कोविड हॉस्पिटल उभारले आहेत तर काही ठिकाणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
उरणमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणं होत आहे. या भागात मोठमोठे प्रकल्प कार्यरत असतानाही येथे सुसज्ज हॉस्पिटलचा अभाव आहे. त्यात गेली अनेक महिन्यापासून कोरोनाचे संकट असतानासुद्धा कोविड हॉस्पिटलची अनेकवेळा मागणी करूनही प्रलंबित आहे.
याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन त्वरित उरणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी जागेची पहाणी करण्याचे आदेश सिडकोचे एमडी मुखर्जी यांना दिले होते. बैठकीच्या दुसर्याच दिवशी जॉईन एमडी कैलास शिंदे आणि इतर अधिकारी वर्ग पहाणी करून गेले.
जागेची पहाणी करून गेल्यानंतर आता जवळ जवळ 10 ते 12 दिवस होऊनही हव्या तशा हालचाली होताना दिसत नाही. इतर ठिकाणी डॉक्टर वर्गाची कमतरता जाणवत असते. त्याठिकाणी शासन खासगी डॉक्टरांवर काम करण्याची सक्ती करीत आहे. मात्र उरणमध्ये स्वतःहून खासगी डॉक्टरांची टीम कोविड हॉस्पिटलमध्ये काम करण्यास तयार असतानाही उरणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास नक्की कशामुळे विलंब होत आहे. याचा थांगपत्ता नाही.
उरणकरांना आता खरी कोविड हॉस्पिटलची गरज आहे. त्यामुळे उरणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का इतर प्रश्नाप्रमाणे हेही अपुरेच राहण्याची शक्यता असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे. तरी याचा विचार शासन दरबारीकरून उरणकरांसाठी कोविड हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात यावे.








Be First to Comment